दिल्ली कॅपिटल्सचा सलग पाचवा पराभव
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव करत या स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदविला. बेंगळूर संघातर्फे सामनावीर विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकवले. तर दिल्ली संघातील मनीष पांडेचे अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. बेंगळूर संघाने 20 षटकात 6 बाद 174 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 बाद 151 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 23 धावांनी गमवावा लागला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते अद्याप उघडू शकलेला नाही.

बेंगळूरच्या डावामध्ये विराट कोहलीने 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 50, कर्णधार डूप्लेसिसने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22, महिपाल लोमरोरने 18 चेंडूत 2 षटकारांसह 26, मॅक्सवेलने 14 चेंडूत 3 षटकारांसह 24, हर्षल पटेलने 1 षटकारासह 6, शहबाज अहमदने 12 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 20 तर अनुज रावतने 22 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. कोहली आणि डूप्लेसिस या सलामीच्या जोडीने 28 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. डूप्लेसिस बाद झाल्यानंतर कोहलीला महिपालकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भर घातली. ललित यादवने कोहलीला 11 व्या षटकात बाद केले. लोमरोर आणि मॅक्सवेल या जोडीकडून फटकेबाजीची अपेक्षा बाळगली गेली. दरम्यान, मार्शने लोमरोरला झेलबाद केले. अक्षर पटेलने हर्षल पटेलला 6 धावांवर बाद केले. कुलदीप यादवने आपल्या एका षटकातील पाठोपाठच्या दोन चेंडूंवर मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांना बाद केले. 14.2 षटकात बेंगळूरने 6 बाद 132 धावा जमविल्या होत्या. शहबाज अहमद आणि रावत या जोडीने 34 चेंडूत 42 धावांची भर घातल्याने बेंगळूर संघाला 174 धावांपर्यंत मजल मारता आली. बेंगळूरच्या डावात 8 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरला 11 धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या. कोहलीचे या स्पर्धेतील हे तिसरे अर्धशतक आहे. दिल्लीतर्फे कुलदीप यादवने 23 धावात 2, मिचेल मार्शने 18 धावात 2 तर अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. सलामीचा पृथ्वी शॉ पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आपले खाते उघडण्यापूर्वी धावचीत झाला. त्यानंतर पार्नेलने मिचेल मार्शला कोहलीकरवी झेलबाद केले. मार्शला खातेही उघडता आले नाही. मोहम्मद सिराजने आपल्या स्वींग गोलंदाजीवर यश धूलला पायचीत केले. त्याने 1 धाव जमविली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर डावातील सहाव्या षटकात तंबूत परतला. वैशाखने त्याला कोहलीकरवी झेलबाद केले. या सामन्यात कोहलीने 3 अप्रतिम झेल टिपत आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. वॉर्नरने 13 चेंडूत 4 चौकारांसह 19 धावा जमविल्या. अभिषेक पोरल हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर केवळ 5 धावा जमवित तंबूत परतला. दिल्ली संघाची यावेळी स्थिती 8.5 षटकात 5 बाद 53 अशी होती.

मनीष पांडे आणि अक्षर पटेल या जोडीवर दिल्ली संघाची भिस्त होती. पण वैशाखने अक्षर पटेलला मोहम्मद सिराजकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. पटेल आणि पांडे या जोडीने सहाव्या गड्यासाठी 27 धावांची भर घातली. अक्षर बाद झाल्यानंतर मनीष पांडे लवकर तंबूत परतला. डिसिल्वाने त्याला पायचीत केले. पांडेने 38 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. वैशाखने ललित यादवला मॅक्सवेलकडे झेल देण्यास भाग पाडले. अमन हकीम खान याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. मोहम्मद सिराजने त्याला कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. नॉर्जे आणि कुलदीप यादव या जोडीने शेवटच्या गड्यासाठी अभेद्य 23 धावांची भागीदारी केली. नॉर्जेने 14 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 23 तर कुलदीप यादवने 1 चौकारासह नाबाद 7 धावा केल्या. दिल्लीच्या डावात 2 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. बेंगळूर संघातर्फे विजयकुमार वैशाखने 20 धावात 3 तर मोहम्मद सिराजने 23 धावात 2 तसेच पार्नेल, हर्षल पटेल आणि हसरंगा डिसिल्वा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 6 बाद 174 (कोहली 50, डूप्लेसिस 22, लोमरोर 26, मॅक्सवेल 24, हर्षल पटेल 6, शहबाज अहमद नाबाद 20, अनुज रावत नाबाद 15, अवांतर 11, कुलदीप यादव 2-23, मिचेल मार्श 2-18, अक्षर पटेल 1-25, ललित यादव 1-29), दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 9 बाद 151 (मनीष पांडे 50, वॉर्नर 19, धूल 1, पोरल 5, अक्षर पटेल 21, अमन हकीम खान 18, ललित यादव 4, नॉर्जे नाबाद 23, कुलदीप यादव नाबाद 7, विजयकुमार वैशाख 3-20, मोहम्मद सिराज 2-23, पार्नेल 1-28, हसरंगा डिसिल्वा 1-37, हर्षल पटेल 1-32).








