आरसीबीवर 8 धावांनी विजय, सामनावीर कॉनवे, दुबे यांची अर्धशतके, देशपांडेचे 3 बळी, मॅक्सवेल, डु प्लेसिसची दणकेबाज अर्धशतके
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 8 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय नोंदविला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी नोंदवलेली तडाखेबंद अर्धशतके वाया गेली. देव्हॉन कॉनवेच्या तसेच शिवम दुबेच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 6 बाद 226 धावा जमवित रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला विजयासाठी 227 धावांचे कठीण आव्हान दिले. चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल स्पर्धेतील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या असून 2011 नंतरची त्यांची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. बेंगळूरच्या मोहम्मद सिराजची गोलंदाजी वगळता इतर गोलंदाजांना पॉवर प्ले आणि शेवटच्या काही षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करता आली नाही. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 8 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावामध्ये सलामीचा विराट कोहली पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने 6 धावा जमविल्या. त्यानंतर तुषार देशपांडेने लोमरोरला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. बेंगळूरची स्थिती यावेळी 2 षटकात 2 बाद 15 अशी होती. डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेत तिसऱ्या गड्यासाठी 10.1 षटकात 126 धावांची शतकी भागिदारी केली. महेश थीक्षणाने मॅक्सवेलला धोनीकरवी झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांसह 76 धावा झोडपल्या. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर कर्णधार डु प्लेसिस पाठोपाठ तंबूत परतला. मोईन अलीने त्याला झेलबाद केले. डु प्लेसिसने 33 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 62 धावा झळकाविल्या. दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा फटकावल्या. तुषार देशपांडेने त्याला झेलबाद केले. पथिरानाने शाहबाज अहमदला झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकारासह 12 धावा केल्या. तुषार देशपांडेने पार्नेलला बाद केले. त्याने केवळ 2 धावा जमविल्या. बेंगळूरची स्थिती यावेळी 7 बाद 197 अशी होती. सुयश प्रभूदेसाईने 11 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावा जमविल्या. पथिरानाने त्याला डावातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद केले. हसरंगा 2 धावांवर नाबाद राहिला. बेंगळूरच्या डावामध्ये 16 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्पे तुषार देशपांडेने 3, पथिरानाने 2 तर आकाश सिंग, थीक्षणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यामध्ये एकूण 444 धावांची बरसात झाली तसेच 33 षटकार आणि 24 चौकारांची आतषबाजी झाली. सामन्यात सर्वाधिक षटकार नोंदवण्याच्या विक्रमाशी येथे बरोबरी झाली.

तत्पूर्वी, या सामन्यात बेंगळूर संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. आयपीएलच्या या मोसमात सातत्याने धावा करणारा ऋतुराज गायकवाड केवळ 3 धावांवर बाद झाला. कॉनवे आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 43 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. हसरंगाने रहाणेचा त्रिफळा उडविला. त्याने 20 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. रहाणे बाद झाल्यानंतर शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करत कॉनवेला चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 37 चेंडूत 80 धावा झोडपल्या. हर्षल पटेलने कॉनवेचा त्रिफळा उडविला. त्याने 45 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह 83 धावा झळकाविल्या. पार्नेलने दुबेला सिराजकरवी झेलबाद केले. त्याने 27 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावा जमविल्या. अंबाती रायुडूने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा केल्या. वैशाखने त्याला झेलबाद केले. चेन्नईच्या डावातील शेवटचे शतक टाकण्यासाठी हर्षल पटेलकडे चेंडू सोपविला. दरम्यान, हर्षल पटेलने या षटकातील सलग दोन चेंडू कंबरेच्या उंचीवरुन टाकल्याने त्याची गोलंदाजी थांबविण्यात आली आणि मॅक्सवेलने उर्वरित 4 चेंडू टाकले. चेन्नईच्या जडेजाने या षटकात 1 षटकारही खेचला. पण मॅक्सवेलने त्याला झेलबाद केले. त्याने 1 षटकारासह 10 धावा केल्या. मोईन अली 2 षटकारांसह 19 धावांवर नाबाद राहिला. धोनीने केवळ नाबाद 1 धाव जमविली. चेन्नईला अवांतराच्या रुपात 7 धावा मिळाल्या. चेन्नईच्या डावात एकूण 17 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. चेन्नईच्या शिवम दुबेने या सामन्यात 111 मी. चा सर्वात लांब षटकार खेचत या हंगामात विक्रम नोंदविला. बेंगळूरतर्फे मोहम्मद सिराज, पार्नेल, विजयकुमार विशाख, मॅक्सवेल, हसरंगा डिस्लिव्हा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 6 बाद 226 (गायकवाड 3, कॉनवे 83, रहाणे 37, शिवम दुबे 52, रायडू 14, मोईन अली नाबाद 19, जडेजा 10, धोनी नाबाद 1, अवांतर 7, मोहम्मद सिराज, पार्नेल, विशाख, मॅक्सवेल, हसरंगा, हर्षल पटेल प्रत्येकी 1 बळी).
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : 20 षटकात 8 बाद 218 (कोहली 6, डु प्लेसिस 62, मॅक्सवेल 76, शाहबाज अहमद 12, दिनेश कार्तिक 28, प्रभूदेसाई 19, पार्नेल 2, हसरंगा नाबाद 2, अवांतर 11, तुषार देशपांडे 3-45, पथिराना 2-42, आकाश सिंग 1-35, थीक्ष्णा 1-41, मोईन अली 1-13).








