रेपोदर जैसे थे राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था /मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 6 डिसेंबरपासून सुरू झाली असून आज शुक्रवारी पतधोरणाची घोषणा होणार आहे. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपोदरात वाढ केली जाणार नसल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तविला जात आहे. समितीच्या मागील चार द्वैमासिक बैठकांमध्ये रेपो दर जैसे थे ठेवण्यात आला होता. सध्या आर्थिक विकासदर योग्य पातळीवर असल्यामुळे ह्यावेळीही रेपोदर स्थिर राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, रेपो दराबरोबरच आरबीआय गव्हर्नर अन्य कोणत्या नव्या घोषणा जाहीर करतात याकडे देशवासियांचे लक्ष लागलेले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्विमासिक बैठक 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात देशाच्या आणि बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत पतधोरण समितीच्या सदस्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानंतर आता शुक्रवारी रेपो दरासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे. दर स्थिर राहिल्यास कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.









