वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीची बैठक सोमवार, 3 एप्रिल 2023 पासून मुंबईत सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या बैठकीत अनेक आर्थिक मुद्यांवर चर्चा झाली असून आरबीआयचे गव्हर्नर गुऊवारी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची घोषणा करतील. त्यानुसार रेपोदरात पुन्हा एकदा पाव टक्क्यांपर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. तसेच देशातील महागाईवरही चर्चा होणार आहे. महागाई रोखण्यासाठी आरबीआय पुन्हा एकदा बेंचमार्क व्याजदरात वाढ करू शकते.
आरबीआयचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांचे मागील एमपीसी बैठकीतील विधान आणि आत्तापर्यंतच्या बाजार तज्ञांच्या अंदाजानुसार रेपोदरात वाढ होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यावेळीही आरबीआय रेपो दरात सुमारे 25 बेसिस पॉईंटने वाढ करू शकते. हे दर वाढवल्यास रेपोमध्ये गेल्या वर्षभरात झालेली ही सातवी वाढ ठरेल.
सोमवारपासून सुरू झालेली आरबीआयची एमसीपी बैठक गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे मुंबईत सुरू असलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. सध्या देशातील किरकोळ चलनवाढ कमी करण्यासाठी आणि जागतिक मध्यवर्ती बँकांशी ताळमेळ राखण्यासाठी आरबीआयवर दबाव आहे. अशा गंभीर स्थितीतच 2023-24 या आर्थिक वर्षाचे पहिले द्विमासिक चलनविषयक धोरण जाहीर करण्यापूर्वी विविध देशांतर्गत आणि जागतिक घटकांचा विचार रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.









