मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक आगामी द्विमासिक पतधोरण बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवणार असल्याचे संकेत स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिले आहेत. खारा यांनी भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आरबीआयच्या पतधोरण बैठकीसंदर्भात भाष्य केले आहे. बँक म्हणून आम्ही धोरणात्मक दर कपातीची अपेक्षा करत नाही. मध्यवर्ती बँक व्याजदराची स्थिती कायम ठेवणार असल्याची शक्यता अध्यक्ष खारा यांनी व्यक्त केली आहे.
पतधोरण बैठक 8 ऑगस्टपासून
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक 8 ते 10 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. 8 जून रोजी झालेल्या चलनविषयक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. तथापि, मध्यवर्ती बँकेने असे म्हटले आहे की महागाई दर आणखी खाली येण्याची गरज आहे.









