रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ
मुंबई / वृत्तसंस्था
भडकलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्याचा एक उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने अनपेक्षिरित्या रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घोषित केला आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांना कर्जफेडीसाठी अधिक ईएमआय द्यावा लागणार आहे. मात्र, त्यावेळी ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर अधिक व्याज मिळणार आहे. बँकेच्या तातडीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. 1 ऑगस्ट 2018 पासून प्रथमच या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
रेपो दराप्रमाणेच कॅश रिझर्व्ह रेश्यो (सीआरआर) मध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांना आता रिझर्व्ह बँकेकडे जास्त पैसे ठेवावे लागणार आहेत. याचा परिणाम म्हणून बँकांकडेचे पैसे कमी होणार आहेत. बँकांची रोखता (लिक्विडीटी) 83,711.55 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.

ईएमआयची रक्कम वाढणार
रेपो दर आणि सीआरआरमध्ये वाढ केल्याने आता बँकांना कर्जे आणि ठेवी या दोन्हींवरचे व्याजदर काही प्रमाणात वाढवावे लागणार आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि व्यक्तिगत कर्ज तरत्या व्याजदराने घेतलेल्यांना कर्जफेडीसाठी जास्त मासिक हप्ता (ईएमआय) भरावा लागणार आहे. किती अधिक रक्कम भरावी लागणार हे आपण घेतलेल्या कर्जाच्या प्रमाणावर आणि कर्जफेडीच्या कालमर्यादेवर ठरणार आहे. ही वाढ किरकोळ असेल. ती असहय़ होईल, अशी असणार नाही. त्याचवेळी ठेवींवरील व्याजदरातही किंचित वाढ होणार आहे. ईएमआय किती वाढणार हे मात्र बँका प्रत्यक्षात व्याजदरात किती वाढ करतात, यावर अवलंबून आहे. त्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
महागाई कमी होणार?
रिझर्व्ह बँकेने हा निर्णय महागाई आणि चलनवाढ कमी करण्यासाठी घेतला आहे. बँका ज्यावेळी रिझर्व्ह बँकेकडून रक्कम उसनी घेतात, त्यावेळी त्यांना रिझर्व्ह बँकेला विशिष्ट दराने व्याज द्यावे लागते. याला रेपो दर, असे म्हणतात. तर सर्व बँकांना त्यांच्याकडे ठेव म्हणून असलेल्या रकमेपैकी काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवावी लागते. त्याला कॅश रिझर्व्ह रेश्यो, असे म्हणतात. हे प्रमाणही वाढल्याने आता बँकांना अधिक रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेव म्हणून ठेवावी लागणार आहे. परिणामी, बँकांकडील रोख रक्कम कमी होणार आहे. साहजिकच लोकांच्या हातात खेळणारा पैसा काही प्रमाणात कमी झाल्याने खरेदीचे प्रमाण कमी होणार आहे. अशाप्रकारे मागणी कमी झाली की वस्तूंचे दर काही प्रमाणात उतरतात, असा अनुभव आहे. हाच परिणाम साध्य करण्यासाठी रेपो दर आणि सीआरआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
नवे बँक दर
प्रकार जुना दर नवा दर
रेपो दर 4.00 टक्के 4.40 टक्के
सीआरआर 4.00 टक्के 4.50 टक्के
रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के 3.35 टक्के
कर्जेच्छुंनी काय करावे?
ज्यांना घरासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी कर्ज घ्यायचे आहे, यांनी ते त्वरित घ्यावे, अशी सूचना तज्ञांनी केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि सीआरआरमध्ये वाढ केल्याने काही दिवसांमध्येच बँका कर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ करणार, हे निश्चित आहे. ही वाढ किती असेल हे लवकरच समजणार आहे. ही वाढ होण्याआधी कर्ज घेतल्यास कमी व्याजदरात ते मिळू शकते.
शेअरबाजार धाराशायी
बँकदर वाढविण्यात आल्याने शेअरबाजारावर याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 1,307 अंकांनी उतरला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही मोठी घट झाली. यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात साधारणतः सव्वा सहा लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले. काही अपवादात्मक कंपन्या वगळता इतर सर्व क्षेत्रांमधील सर्व महत्त्वाच्या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे दिसून आले.









