वृत्तसंस्था/ हरारे
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान झिंबाब्वेने शनिवारी पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात झिंबाब्वेचे फलंदाज सिकंदर रझा आणि वेस्ले मधेवेरे यांची कामगिरी दर्जेदार झाली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने 20 षटकात 3 बाद 205 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 6 बाद 188 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 17 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी येथे खेळविला जात आहे. झिंबाब्वे संघाचा हा सलग सहावा विजय आहे. गेल्या जूनमध्ये झिंबाब्वेचे माजी फलंदाज डेव्ह हॉटन यांच्याकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे आल्यानंतर झिंबाब्वे संघाने सलग सहा सामने जिंकले आहेत. हॉटनकडे दुसऱयांदा प्रमुख फलंदाज प्रशिक्षकपद झिंबाब्वे क्रिकेट संघटनेने बहाल केले आहे. बांगलादेशने गेल्या 14 टी-20 सामन्यामध्ये 13 सामने गमाविले आहेत.
शनिवारच्या सामन्यात झिंबाब्वेचा फलंदाज सिकंदर रझाने 26 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 65 धावा तर मधेवेरेने 67 धावा झळकविल्या. दुखापतीमुळे मधेवेरेने डावातील शेवटचे षटक बाकी असताना मैदान सोडले. मध्वेरेने 9 चौकार ठोकले. मधेवेरेने कर्णधार क्रेग इर्व्हिन, सिन विलियम्स आणि सिकंदर रझा यांच्या समवेत महत्त्वपूर्ण भागीदाऱया केल्या. प्रत्युत्तरा दाखल खेळताना बांगलादेशच्या डावात यष्टीरक्षक आणि हंगामी कर्णधार नुरुल हसनने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 42, नजमुल हुसेनने 1 षटकार आणि 3 चौकारासह 37 धावा जमविल्या. झिंबाब्वेतर्फे जाँग्वेने 34 धावात 2 गडी बाद केले. या मालिकेसाठी बांगलादेश संघाला अनुभवी शकीब अल हसन, मेहमुदुल्लाह रियाद, रहीम आणि नुकताच निवृत्त झालेल तमीम इक्बाल यांची उणीव भासत आहे.
संक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे 20 षटकात 3 बाद 205 (सिकंदर रझा नाबाद 65, मधेवेरे 67), बांगलादेश 20 षटकात 6 बाद 188 (नुरुल हसन 42, नजमुल हुसेन 37, जाँग्वे 2-34).









