शहरवासियांच्या दृष्टीला सहसा भुंगा हा कीटक पडत नाही. त्याचा रहिवास हा रानावनात, सुगंधी फुलांच्या बनात असतो. गुं गुं करीत फिरणारा एखादा भुंगा जर कधी घरात शिरला तर तो बाहेर कसा जाईल यासाठी सारे घर कामाला लागते. भुंग्याचा दंश भयंकर असतो. भुंगा चुकून जर कानात गेला तर कानाच्या पडद्याला झालेली इजा लवकर भरून निघत नाही. भुंगा हा कीटकसृष्टीच्या साखळीमध्ये महत्त्वाचा असल्यामुळे तो आध्यात्मिक क्षेत्रात केंद्रस्थान मिळवून बसला आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात माऊली म्हणतात-
‘जैसे भ्रमर परागू नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये: ’
ज्ञानेश्वरी कशी वाचावी हे माऊली स्पष्टपणे सांगतात. कमळातला पराग हा सुगंधी आणि कोमल असतो. महाभारत हे कमळ आहे तर भगवद्गीता हा पराग आहे. कमळातला पराग भुंगा सेवन करतो. भुंग्याच्या पायाला काटे असतात. कमळातला पराग सेवन करायला काटेरी पायांचा भुंगा इतक्या हळुवारपणे कमळात पाय टाकतो की त्या कमळाला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. नाजूक पराग नाजूकपणे भ्रमर सेवन करतो. माऊली म्हणतात त्याप्रकारे हा ग्रंथ सेवन करताना आपली वृत्ती जडातून सूक्ष्मात नेत मृदू करावी आणि मन कोमल, स्वच्छ करूनच हा ग्रंथ पवित्रपणे वाचावा. माऊली भुंग्याचा आणखी एक अप्रतिम दृष्टांत देतात. ते म्हणतात-
‘जैसा भ्रमर भेदी कोडे ।भलतैसे काष्ठ कोरडे
परि कळिकेमाजी सांपडे । कोवळीये?’
भुंग्याच्या पायाला जसे काटे असतात तसे त्याचे पुढचे दातही कठीण आणि तीक्ष्ण असतात. म्हणून तो अतिशय सहजतेने मोठमोठी लाकडे आपल्या दातांनी कुरतडतो, पोखरतो. हा भुंगा परागसेवनाच्या मोहाने दिवसा कमळात जातो. संध्याकाळ झाली की कमळ मिटते आणि त्यात तो अडकतो. कमळाच्या पाकळ्या चिरून तो सहज बाहेर निघू शकतो, मात्र तसे न होता त्याला मरण येते. तो प्राणाला मुकतो. परंतु पाकळ्या चिरण्याचे त्याच्या मनातसुद्धा येत नाही. हे प्रेम अत्यंत कोवळे, नाजूक परंतु कठीण आहे.
माऊलींनी भुंग्यावर लिहिलेला अभंग प्रसिद्धच आहे. ‘रुणुझुणु रुणझुणु रे भ्रमरा। सांडी तू अवगुणु रे भ्रमरा:’ मानवी जिवाला माऊली भ्रमराची उपमा देतात. ते म्हणतात, अरे जिवा, दुर्लभ असा नरदेह लाभला आहे. तू इंद्रियकमळात न अडकता हरीकमळात अडकून जा. आपले अवगुण दूर करून त्या सौभाग्यसुंदर चरणकमळदलात सुमनसुगंध असणाऱ्या बापरखुमादेवीवरु विठ्ठलात तू रममाण हो. खराखुरा भ्रमर नुसताच या फुलावरून त्या फुलावर भ्रमत असतो. त्याला कुठेही जसे सुख मिळत नाही तसे तुझे मात्र नाही. तू शाश्वताकडून अशाश्वताकडे जा.
श्री दत्तसंप्रदायामध्ये भ्रमर-कीटक न्याय प्रसिद्ध आहे. गुरूंनी केलेल्या शिष्याच्या उद्धाराला ‘भ्रमर-कीटक न्याय’ असे म्हणतात. सृष्टीत जन्माला येणारा प्रत्येक जीव हा स्त्राr-पुरुष संपर्कातूनच या जगात येतो. भ्रमराचे वैशिष्ट्या असे आहे की सर्वांहून वेगळी अशी वंशवृद्धीची पद्धत त्याच्याजवळ आहे. नरमादीविना मातीमधून भ्रमर निर्माण होतो. कोणताही एखादा किडा भुंगा आपल्या पायात धरून मातीच्या घरट्यात आणून ठेवतो. ते घरटे बंद करण्यासाठी तो जेव्हा पुन्हा माती आणायला जातो तेव्हा तो किडा पळून जाऊ नये म्हणून त्याला दंश करतो. त्या भयंकर दंशाने तो किडा बेशुद्ध पडतो. भुंगा घरट्याचे तोंड बंद करून त्याच्याभोवती गुं गुं करतो. बंदी झालेला किडा जेव्हा शुद्धीवर येतो आणि परत त्या भुंग्याचे गुणगुणणे ऐकतो तेव्हा हा भुंगा पुन्हा आपल्याला दंश करेल या भीतीने तो सदैव भ्रमराचेच ध्यान करतो. भुंग्याचे निरंतर ध्यान केल्याने तो साधारण किडा भ्रमरात रूपांतरित होतो. त्या किड्यामध्ये भुंग्याचे रूप, त्याची आवाज करण्याची शक्ती हे सर्व संक्रमित होते. अशा रीतीने भ्रमराची वंशवृद्धी होते. हा दृष्टांत सद्गुरूंनी शिष्यावर केलेल्या कृपेसाठी दिला जातो. सद्गुरूसुद्धा आपला ज्ञानवंश अशा प्रकारे पुढे नेतात. जात-पात, कुळ, वय, लिंगभेदाशिवाय सद्गुरू आपल्या सामान्य शिष्याला स्थूल देहाच्या प्रापंचिक अवस्थेतून सोडवून त्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी तयार करतात. ज्याप्रमाणे भ्रमर स्वत: जाऊन किडा आणतो त्याप्रमाणे सद्गुरू संकल्पबळाने शिष्याला आकर्षित करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘सद्गुरुवाचोनी सापडेना सोय ।
धरावे ते पाय आधी आधी।
आपणासारिखे करिती तात्काळ।
नाही काळवेळ तयालागी?’
सद्गुरूंचा महिमा सांगताना भ्रमर हा केंद्रस्थानी आहे. श्री दत्तप्रभूंनी भ्रमराला विशेष स्थान दिले आहे. शास्त्रज्ञ असे म्हणतात की भुंग्याचे शरीर जाड असते. त्या मानाने त्याचे पंख खूपच लहान असतात. हवेच्या गतीशास्त्रानुसार भुंगा उडू शकत नाही. तरीही तो अडचणीशिवाय उडत राहतो. निसर्गाकडून शिकायला हवे की स्वत:वर मर्यादा लादून न घेता स्वत:लाच आश्चर्याचा धक्का देत आव्हाने पेलत जावीत. सुप्रसिद्ध विदूषी दुर्गाबाई भागवत यांनी त्यांचा एक अनुभव सांगितलेला आहे. एकदा त्या कान्हेरी येथे जगातले सर्वात जुने बौद्धांचे स्मशान बघायला गेल्या होत्या. तिथे उग्र वासाची पिवळ्या रंगाची डिकेमालीची बेसुमार फुले फुलली होती. त्या फुलांवर असंख्य भुंगे गुणगुणत होते. संगीततज्ञ अशोकजी रानडे यांनी दुर्गाबाईंच्या सांगण्यावरून त्या भुंग्यांच्या आवाजातील नोटेशन तयार केले आणि सांगितले की ऋग्वेदाच्या पठणासारखेच भुंग्यांच्या आवाजाचे चढउतार होते. नंतर काही जपानी अभ्यासकांनी भुंग्यांच्या आवाजाचे संशोधन केले आणि निष्कर्ष काढला की बौद्ध भिक्षू मंत्रपठण करतात तेव्हा असाच नाद असतो.
शिवगणातला प्रमुख गण म्हणजे भृंगीश. तो शिवाला सतत प्रदक्षिणा घालत असे. शिवाने अर्धनारी नटेश्वराचे रूप घेतले तेव्हा भृंगिशाने भुंग्याचे रूप घेतले आणि अर्धनारी रूपाच्या मध्यावर छिद्र पाडून तो पार्वतीशिवाय एकट्या शिवाला प्रदक्षिणा घालू लागला. हे पार्वतीला आवडले नाही. तिने रागावून त्याला तू क्षयी होशील असा शाप दिला. या शापामुळे भृंगीश अशक्त झाला तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन त्याला तिसरा पाय दिला अशी कथा आहे. शिवाच्या गळ्यात भुंग्यांची माळ असते. शिवाच्या माळेतील एका भुंग्याने महिरावणाच्या वधासाठी प्रत्यक्ष मारुतीरायांना मदत केली. रामायणामध्ये याचे वर्णन आहे. माणसाच्या डोक्याला विचारांचा भुंगा लागतो तेव्हा माणसं थकून जातात. अध्यात्मात डोकावून भुंग्याचा अभ्यास करावा आणि विचारांच्या भुंग्यातून मुक्त व्हावे हेच खरे.
-स्नेहा शिनखेडे