वार्ताहर/ किणये
बेळगुंदी गावातील जागृत रवळनाथ देवस्थान यात्रेला शनिवार दि. 27 रोजीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रा दोन दिवस भरविण्यात आली आहे. ग्रामस्थ, पंचकमिटी, देवस्थान पंच कमिटी व गावकऱ्यांच्यावतीने गावात यात्रेची गेल्या आठ दिवसापासून तयारी करण्यात आली आहे.
यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. शनिवारी सकाळी गावातील सर्व देवदेवतांची पूजा करून यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रवळनाथ मंदिराजवळ भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठाचा गजर झाला. यावेळी वारकरी सांप्रदाय तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रात्री भजनाचे कार्यक्रम झाले.
रविवार दि. 28 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. पश्चिम भागातील बेळगुंदी गावचे रवळनाथ देवस्थान हे जागृत असून या मंदिराला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या संख्येने असते. रविवारी भक्तांसाठी दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. बेळगुंदीसह बोकनूर, सोनोली, आदी गावातील व परिसरातील भाविकांची रवळनाथ देवस्थान हे श्रद्धास्थान आहे.
रविवारी सकाळी 8.30 वा. गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी होणार आहेत. पालखी मिरवणुकीदरम्यान सर्व देवदेवतांची पूजा करून गाऱ्हाणा घालण्यात येणार आहे, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली. दुपारी 12 नंतर रवळनाथ मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्यावतीने गाऱ्हाणा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 1 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









