बेळगुंदी येथे मंदिर लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ : ढोलताशा-पारंपरिक वाद्यांचा गजर : गुलालाची उधळण : कलशधारी महिलांची लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर/किणये
बेळगुंदी येथील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रविवारी सकाळी रवळनाथ मूर्ती व कळस मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ढोलताशा व पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. वारकरी टाळ, मृदंगाच्या गजरात विविध अभंग गाताना दिसले. महिला मोठ्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आली. देव रवरळनाथाची ही मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात झाली. ग्रामस्थांनी रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला होता. दानशूर मंडळी, गावकरी व अनेकांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थ पंचकमिटीच्या अथक परिश्रमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्णत्वास
रवानाथाचे देवस्थान जागृत आहे. रवळनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले आणि त्यांचा संकल्प पूर्णत्वास आला आहे. अरभावी दगड व चिरांमध्ये बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर विलोभनीय दिसत आहे. अशा पद्धतीचे बांधकाम झालेले मंदिर या भागात पहिलेच आहे.
देव रवळनाथाचा जयघोष
रविवारी सकाळी विठ्ठल रखुमाई मंदिर येथून रवळनाथ मूर्ती व कळस मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे व मनीषा मोहन मोरे यांच्या हस्ते केले. यानंतर देव रवळनाथाचा जयघोष करत टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत महिला फुगडी खेळताना दिसत होत्या. वारकरी टाळ, मृदंगाच्या गजरात दंग झाले होते. तरुणाई ढोल, ताशांच्या तालावर गुलालाची उधळण करत जल्लोष करत होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, कलमेश्वर गल्ली, पाटील गल्ली, गावडे गल्ली, चव्हाट गल्लीमार्गे ही मिरवणूक रवळनाथ मंदिर येथे आली. मिरवणुकीत तरुणांनी विविध रंगाचे कुर्ते परिधान केले होते. वीणा पूजन भाऊ अमरोळकर त्यांनी केले. वीणा सेवा नेमानी चव्हाण यांच्याकडे देण्यात आली होती. या मिरवणुकीत पश्चिम भागातील विविध गावांमधील भजनी मंडळे सहभागी झाली होती. धन्याधिवास विधी विनायक कुन्नूरकर, रणजीत पाटील, महेश शहापूरकर, सागर शिंदे, अशोक बोकडे आदींच्या हस्ते करण्यात आली. रात्री गावातील भजनी मंडळांचा जागर भजनाचा कार्यक्रम झाला.
आज-उद्या विविध पूजन कार्यक्रम, महिलांचा हरिपाठ
सोमवार दि. 12 रोजी सकाळी देव देवतांना आवाहन व दुपारी चार वाजता हरिपाठ होणार आहे. मंगळवार दि. 13 रोजी गणेश पूजन, मंडप पूजन, कुमारिका पूजन, गोमाता पूजन, पीठ देवता स्थापना आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी चार वाजता राम कृष्ण हरी महिला यांचा हरिपाठचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर विठ्ठल पाटील यांचे प्रवचन होणार आहे. सायंकाळी सात वाजता संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप श्रीगुरू पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे.
बुधवारी कळसारोहण-मूर्ती प्रतिष्ठापना, 15 ला मंदिर उद्घाटन
बुधवार दि. 14 रोजी कळसारोहण, मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना मुक्तीमठ येथील शिवसिद्ध सोमेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी माहेरवासिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 15 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे ग्रामस्थ पंचकमिटीतर्फे कळविण्यात आले आहे.









