वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने रवनीत कौर यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. माजी सीसीआय अध्यक्ष अशोक गुप्ता यांचा कार्यकाळ 2022 मध्ये पूर्ण झाल्यापासून हे पद रिक्त होते. मागीलवर्षी ऑक्टोबरमध्ये सीसीआय सदस्य संगीता वर्मा यांच्याकडे अंतरिम अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. आता वर्मा यांच्याकडून रवनीत कौर यांच्याकडे सूत्रे प्रदान केली जातील.
नवनियुक्त अध्यक्षा रवनीत कौर ह्या पंजाब केडरच्या 1988 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, जे आधी असेल तोपर्यंत असेल. गेल्या दोन दशकांत कौर यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 2017 ते 2019 दरम्यान इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. सीसीआय म्हणजे भारतीय प्रतिस्पर्धा आयोग ही एक नियामक संस्था असून तयाचे उद्दिष्ट बाजारपेठेत निष्पक्ष स्पर्धा राखणे आहे. या संस्थेने अलीकडेच 16 वर्षे पूर्ण केली आहेत. तर यूएस फेडरल ट्रेड कमिशन 100 वर्षांहून अधिक जुने आहे.









