वृत्तसंस्था / कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व पिस्तुल आणि रायफल नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या रविंद्र सिंगने वैयक्तिक गटात सुवर्ण तर सांघिक गटात रौप्य पदक मिळविले. महिलांच्या विभागात इलाव्हेनील व्हॅलेरव्हेनने महिलांच्या 10 मी. एअरपिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक घेतले.
भारतीय सेनादलात हवालदार या पदावर असलेल्या 29 वर्षीय रविंद्र सिंगने पुरूषांच्या 50 मी. फ्रि पिस्तुल नेमबाजीत शनिवारी सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी या क्रीडा प्रकारात 569 शॉट्स नोंदवित आघाडीचे स्थान पटकावित सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात द. कोरियाच्या किम चेआँगयाँगने रौप्य पदक मिळविताना 556 शॉट्स तर अॅन्टोन अॅरिस्टेरकोव्हने 555 शॉट्ससह कांस्यपदक पटकाविले. बाकू येथे 2023 साली झालेल्या विश्वनेमबाजी स्पर्धेत रविंद्र सिंगने कांस्यपदक मिळविले होते.
50 मी. सांघिक पिस्तुल नेमबाजी प्रकारात रविंद्र सिंग, कमलजित, योगेशकुमार, यांनी एकूण सरासरी 1646 शॉट्स नोंदवित भारताला रौप्य पदक मिळवून दिले. या क्रीडा प्रकारात द. कोरियाने 1648 शॉट्ससह सुवर्णपदक तर युक्रेनने 1644 शॉट्ससह कांस्यपदक घेतले. या सांघिक प्रकारात रविंद्रने 569, कमलजितने 540 तर योगेशकुमारने 537 शॉट्स नोंदविले. महिलांच्या 10 मी. एअररायफल नेमबाजीत भारताची महिला नेमबाज आणि दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली इलाव्हेनील व्हॅलेरव्हेनने कांस्यपदक पटकाविले. द. कोरियाच्या हायजॉनने सुवर्णपदक तर चीनच्या झीफेईने रौप्यपदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअररायफल सांघिक प्रकारात भारताने 1893.3 गुणांसह कांस्यपदक घेतले. या क्रीडा प्रकारात चीनने 1901.7 गुणांसह सुवर्ण तर द. कोरियाने 1899.9 गुणांसह रौप्य पदक घेतले.









