जंगी मिरवणूक काढत कार्यकर्त्यांचा जल्लोष
सांगरूळ प्रतिनिधी
करवीरचे माजी सभापती रवींद्र मडके यांची कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड झाली आहे .रवींद्र मडके यांच्या निवडीने म्हारुळ गावाला कुंभीचे पहिले संचालकपद मिळाले आहे .कार्यकर्त्यांनी गावातून जंगी मिरवणूक काढत मडके यांच्या निवडीचा आनंद उत्सव साजरा केला.
रवींद्र मडके हे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू विजय गंगावेश तालमीचे माजी पैलवान आहेत .तालमीतून निवृती घेतल्यानंतर त्यानी म्हारुळ (ता करवीर) गावचे दहा वर्षे सरपंच पद भूषवले . तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली गावात सेवा संस्था ,पतसंस्था व दुध संस्था उत्तम प्रकारे चालल्या आहेत . काँग्रेसचे कट्टर व संयमी कार्यकर्ते म्हणून रवींद्र मडके यांना करवीर तालुक्यात ओळखले जात होते .काँग्रेसच्या माध्यमातून त्यांची सांगरूळ पंचायत समिती मतदार संघातून करवीर पंचायत समितीवर दोन वेळा सदस्य म्हणून निवड झाली होती .पंचायत समितीत एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिले.दरम्यानच्या काळात त्यांना करवीर पंचायत समितीच्या सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली .मिळालेल्या संधीचे सोने करताना त्यांनी करवीर तालुक्यात निर्मलग्राम योजना प्रभावीपणे राबविली होती.निर्मल ग्राम योजनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे त्यांची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली.
यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला .शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटातून त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक इतर मागासवर्गीय गटातून लढवली . नवखे असूनही त्यांनी चांगल्या प्रकारचे मते घेतली होती . फेब्रुवारी २०२३ ला झालेल्या कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे सत्तारूढ नरके पॅनेल मधून उमेदवारी निश्चित मानली जात होती .पण पॅनलच्या रचनेमध्ये उमेदवारीचा गटवार समतोल साधण्याच्या कारणामुळे त्यांना यावेळी थांबावे लागले होते .तरीही त्यांनी नाराज न होता गटाशी एकनिष्ठ राहत नरके पॅनलच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते .त्यांच्या निष्ठेची दखल घेऊन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्यांची तज्ञ संचालक पदी निवड केली . यामुळे म्हारुळ गावाला मडके यांच्या रूपाने कुंभीचे पहिले संचालक पद मिळाले .त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढली .
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना नूतन संचालक रवींद्र मडके यांनी सर्वसामान्य जनतेने ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्या त्या ठिकाणी प्रामाणिक व एकनिष्ठपणे काम केले आहे .भविष्यातही कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी हिताचा कारभार करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली .
यावेळी ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, दूध संस्था ,पतसंस्था व तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .