ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एका मागासवर्गीय महिला खासदाराला जेलमध्ये टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) नामर्दासारखं काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांचं हे काम पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही वाईट वाटत असेल, अशी टीका आ. रवी राणा (Ravi Rana) यांनी केली.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राणा बोलत होते. ते म्हणाले, इंग्रजांच्या काळात राजद्रोहाचं कलम देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्या महापुरुषांवर लावली होती. तेच कठोर कलम आमच्यावर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरुन लावण्यात आलं. हनुमान चालिसा पठणामुळे अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. महाराष्ट्रात आज शेतकऱयांचे प्रश्न, बेरोजगारी, लोडशेडिंग अशी अनेक संकटं आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची ही दशा झाली आहे. त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे, यासाठी आम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं होतं. पण आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
उद्धव ठाकरे नेहमी सभेत म्हणतात आम्ही मर्द आहोत, आपण मर्दासारखं काम करतो. पण एका मागासवर्गीय महिला खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तिला जेलमध्ये टाकलं. हे नामर्दासारखं काम पाहून बाळासाहेबांनाही वरुन दु:ख होत असेल. दरम्यान, उद्धव ठाकरेंची 14 मेला बीकेसी मैदानावर सभा आहे. त्याचदिवशी आम्ही महाराष्ट्र संकटमुक्त व्हावा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी दिल्लीतील एका प्राचीन मंदिरात हनुमान चालीसाचं पठण करणार आहोत, असेही राणा म्हणाले.