वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या संकुलात सुरू असलेल्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणी स्पर्धेत भारताचे अव्वल मल्ल ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवि दाहिया तसेच महिलांच्या विभागात अन्शू मलिक आणि सरिता मोर यांना प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागल्याने हे मल्ल आशियाई स्पर्धेसाठी अपात्र ठरले आहेत.

या निवड चाचणी स्पर्धेत रविवारी पुरुषांच्या 57 किलो वजनगटात महाराष्ट्राच्या अतिष तोडकरने रवि दाहियाचा पराभव केल्याने आता दाहियाला आशियाई स्पर्धेपासून वंचित व्हावे लागले आहे. तोडकरने दाहियावर या लढतीत एका क्षणी 20-8 अशा गुणांची आघाडी मिळवली होती.
महिलांच्या विभागात ग्रीको रोमन प्रकारात सरिता मोर आणि अन्शू मलिक यांना हार पत्करावी लागल्याने ते आगामी आशियाई स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. सरिता आणि अन्शू हे या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकले नाहीत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या लवाद समितीने अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या समस्या दिवसेंदिवस चिघळत असल्याचे पाहून त्यांनी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना अनुक्रमे 65 व 53 किलो वजन गटासाठी आशिया स्पर्धेकरिता थेट प्रवेश निवड चाचणी न घेताना दिला आहे. चालू आठवड्याच्या अखेरीस आशियाई स्पर्धेसाठी भारतीय मल्लांचा संघ निश्चित केला जाईल.
आगामी आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या एकूण 11 मल्लांची निवड केली जाणार असून ग्रीको रोमन प्रकारात 6 तर महिलांच्या विभागात 5 सदस्यांची निवड होईल. महिलांच्या निवड चाचणी प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सरिता मोरने 57 किलो वजन गटात अन्शू मलिकचा 6-4 अशा गुणांनी पराभव केला पण त्यानंतर सरिता मोरला उपांत्य फेरीत मानसी अहलावतकडून पराभव पत्करावा लागल्याने सरिता मोर व अन्शू मलिक या दोन्ही मल्लांना आशियाई स्पर्धेपासून वंचिव व्हावे लागले आहे. अलीकडेच झालेल्या कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत मानसी अहलावतने कास्यपदक मिळवले होते. 2022 सालातील 20 वर्ष वयोगटातील विश्व चॅम्पियन अंतिम पांगलने निवड चाचणीच्या अंतिम लढतीत मंजूचा पराभव केला पण 19 वर्षीय पांगल विनेश फोगटसाठी राखीव म्हणून राहिल. महिलांच्या 50 किलो वजन गटात राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कास्यपदक विजेत्या पूजा गेहलोतने अंतिम लढतीत निर्मला देवीचा पराभव करत आशियाई स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. महिलांच्या 62 किलो वजन गटात सोनम मलिकने मनीषाचा पराभव केला. या निवड चाचणीमध्ये 76 किलो वजनगटात राधिकाने प्रियांकाचा पराभव केला. हा या निवड चाचणी स्पर्धेतील धक्कादायक निकाल म्हणावा लागेल. 60 किलो पुरुषांच्या ग्रीको रोमन गटामध्ये ज्ञानेंद्रने आपले आव्हान जिवंत राखले. नीरज, नवीन आणि नरिंदर चिमा यांना मात्र आशियाई स्पर्धेसाठी स्थान मिळू शकले नाही. त्याचप्रमाणे साजन बनवालही अपयशी ठरला.









