दोन तरुणींसह सातजण अटकेत : 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी : खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांची राजकीय कोंडी
प्रतिनिधी / पुणे
पुणे शहरातील आयटी पार्क परिसरात खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सर्व्हिस अपार्टमेंटमधील सदनिकेत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री साडेतीन ते साडेचारच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या पार्टीत कोकेन, गांजा या अंमली पदार्थसह, दाऊ, बियर, हुक्क्याचे सेवनदेखील करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर ( वय 41) हेही सापडल्याने खळबळ उडाली आहे. खेवलकरांसह पाच पुऊष तसेच दोन तऊणींचा या पार्टीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून या सर्वांना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, जावई ड्रग्ज पार्टीत आढळल्याने एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जात आहे.
प्रांजल मनीष खेवलकर, (वय 41 वर्षे, रा. प्लॉट नं. 57.58 इंद्रप्रस्त सोसायटी, हडपसर, पुणे), निखिल जेठानंद पोपटाणी ( वय 35, डीएसके सुंदरबन, माळवाडी रोड, पुणे), समीर फकीर महमंद सय्यद, (वय 41, पॅलेस ओरचड सोसायटी, एनआयबीएम रोड, पुणे), सचिन सोनाजी भोंबे, (वय 42, डायमंड वॉटर पार्क रोड, वाघोली पुणे), श्रीपाद मोहन यादव, (वय 27, पंचतारानगर, पांढरकर वस्ती, आकुर्डी, पुणे ) तसेच महिला ईशा देवज्योत सिंग, (वय 22, रा. ए 6, 203 कुमार बिर्ला, औंध, पुणे), प्राची गोपाल शर्मा ( वय 23, म्हाळुंगे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींच्या ताब्यातून 2.70 ग्रॅम कोकेनसदृश अमली पदार्थ, 70 ग्रॅम गांजासदृश
अमली पदार्थ, एकूण 10 मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बियरच्या बॉटल, हुक्का प्लेवर असा असा एकूण 41 लाख 35 हजार 400 ऊपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत खराडी पोलीस स्टेशन येथे संबधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची रुग्णालयात वैद्यकीय चाचणी
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले, की की खराडी येथील स्टेबर्ड अझूर सूट या ठिकाणी रूम क्रमांक 102 मध्ये काहीजण ड्रग पार्टी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला व दोन महिलांसह सात जणांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून अमली पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरोधात खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ससून ऊग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते का, हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समजून शकेल.
आधीही झाल्या दोन पार्ट्या
खराडीतील या ड्रग्ज पार्टीपूर्वी पहिली पाटीं कल्याणनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री दीडपर्यंत पार्टी सुरू होती. त्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. या हॉटेलला रात्री तीन वाजेपर्यंत परवानगी होती. हे सर्व जण खराडीतील एका फ्लॅटमध्ये आले. त्यानंतर याच फ्लॅमध्ये रात्री साडेतीन ते साडेचारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला व हा सर्व प्रकार उघडकीस आला, अशी माहिती समोर आली आहे.
कारवाई हे राजकीय षडयंत्र : आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी ‘रेव्ह पार्टी’ हा शब्द वापरला असता न्यायाधीशांनी तो शब्द वापरू नये, असे सांगितले. आरोपींनी अमली पदार्थ कुठून आणले याचा तपास करायचा असल्याने 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी असा दावा केला की, ही संपूर्ण कारवाई राजकीय षड्यंत्र रचून करण्यात आली आहे. तसेच आरोपींनी कोणतेही अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते आणि पोलिसांनीच अमली पदार्थ ‘प्लांट’ केले असावेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असून ते न्यायालयात सादर करतील, असेही त्यांनी सांगितले. खेवलकर यांना यापूर्वीही तीन वेळा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांच्याकडे कोणताही अमली पदार्थ आढळला नाही, असेही वकिलांनी नमूद केले.
आरोपींना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी साध्या वेशात येऊन व्हिडिओ शूटिंग केले असावे आणि त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सातही आरोपींना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खडसेंची राजकीय कोंडी
मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीतील अनेक नेत्यांची प्रकरणे रोहिणी खडसे यांनी लावून धरली आहेत. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांचेच पती रेव्ह पार्टीसारख्या प्रकरणात त्यांची व त्यांचे वडील एकनाथ खडसे यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.
मला याचा अंदाज होताच : एकनाथ खडसे
याबाबत एकनाथ खडसेप्रतिक्रिया देताना म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिली. माझे प्रांजल खेवलकर यांच्याशी बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. या प्रकरणामध्ये तथ्य असेल, ती खरेच रेव्ह पार्टी असेल, तर जावई असो किंवा कुणीही असा। त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल, तर तेही सहन केले जाणार नाही, असे खडसे यांनी सुनावले.
…त्यानंतरच सविस्तर बोलेन : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पुण्यातील या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीच्या घटनेबाबत मी माध्यमांत बातम्या पाहिल्या आहेत. मी सकाळपासून कार्यक्रमात आहे. त्यामुळे मला त्या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती घेता आलेली नाही. मात्र, माध्यमांमधून जी काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्या कारवाईत काही ड्रग्ज वगैरे आढळून आलेले आहेत. या घटनेची मी जेव्हा अधिकृत माहिती घेईल, तेव्हा सविस्तर बोलू शकेन. पण प्राथमिक माहितीनुसार अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.








