कोल्हापूर / धीरज बरगे :
दक्षिण आफ्रीका खंडातील मालावी देशातून रत्नागिरीचा हापूस कोल्हापूर बाजार समितीमध्ये दाखल झाला. तोच रंग, आकार आणि चव असणारा हा मालावी आंबा प्रति रत्नागिरी हापूसच आहे. समितीमधील प्रसाद वळंजू यांच्या गाळा नं 1 दुकानामध्ये 20 नगांच्या 15 बॉक्सची बुधवारी आवक झाली. सुमारे 3600 रुपये दराने मालावी आंब्याची विक्री झाली. पुढील दीड महिना या आंब्याची आवक बाजार समितीमध्ये सुरु राहणार आहे.
रत्नागिरी, देवगड हापूस आंब्याची चव चाखायला फेब्रुवारी, मार्च तर सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल मे महिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागते. रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात, देशात आणि परदेशातही कोकणचा हापूस पाठवला जातो. मात्र आता आंब्याचा सीझन सुरु होण्यापुर्वी दोन महिने आगोदरच कोल्हापूरवासियांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. बाजार समितीत दक्षिण आफ्रीकेतून आलेल्या 15 बॉक्स मालावी हापूस आंब्याची बघता बघता विक्री झाली. हापूसच्याची चवीचा असणाऱ्या या आंब्याला खवय्येप्रमी कोल्हापूरकरांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रत्नागिरी हापूसची मालावी देशात लागवड
दक्षिण आफ्रीका खंडातील मालावी देशातील एका उद्योजकाने 2012 मध्ये दापोली (जि. रत्नागिरी) येथून हापूस आंब्याचे मातृवृक्ष मालावीला नेले होते. येथे सुमारे सातशे हेक्टरवर या वृक्षांची लागवड केली. साधरणत: 2106 पासून या वृक्षांना आंबे लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही प्रमाणत हा आंबा भारतात निर्यात होण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन ते चार वर्षांपासुन नियमितपणे या आंब्याची भारतात आवक सुरु आहे. तसेच युरोप आणि आखाती देशातही या आंब्याची मालावीमधून निर्यात होते.
आंब्याला नावच मालावी अल्फोन्सो
आंब्यामध्ये अनेक प्रकार असले तरी कोकणातील देवगड आणि रत्नागिरी हापूसची ओळख संपूर्ण देशभरात आहे. या दोन हापूस आंब्यांना मोठयाप्रमाणात मागणी आहे. या आंब्यांप्रमाणेच मालावी देशात उत्पादित होणाऱ्या या हापूस आंब्यालाही मालावी अल्फोन्सो असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे कोकणचा हापूस आता मालावी अल्फोन्सो नावानेही ओळखला जाणार आहे.
चव, रंग, रुप तेच फक्त देश वेगळा
मालावी अल्फोन्सो हा कोकणचाच हापूस आंब आहे. दक्षिण आफ्रीका खंडातील वातावरणही उष्ण, दमट असल्याने ते हापूस आंब्यासाठी पोषक आहे. त्यामुळे मालावी देशात उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याची चव, रंग, रुप हे रत्नागिरी हापूस प्रमाणाचे आहे. फक्त तो बाहेरच्या देशातून भारतामध्ये आयात होतो.
वाशीमध्ये दीड ते दोन महिने आवक
हापूसच्या हंगामापुर्वीचे हापूस आंब्याचीच चव देणाऱ्या या मालावी अल्फान्सोला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मुंबईतील वाशी मार्केटमध्ये या आंब्याची आवक होते. तेथून हा आंबा संपूर्ण राज्यभरात पोहचविला जातो. मुंबई, पुण्यामध्ये मोठयाप्रमाणात या आंब्याची विक्री होते.
तामिळनाडू हापूस येईपर्यंत आवक
हंगामापुर्वी मालावी अल्फान्सो बाजारात उपलब्दा होत असल्याने या आंब्याचे दर जास्त आहेत. तामिळनाडूचा आंबा बाजारपेठेत दाखल होईपर्यंत मालावी हापूसची भारतामध्ये आयात सुरु राहते. मालावीच्या तुलनेत तामिळनाडूच्या आंब्याच्या दर कमी आहे. तामिळनाडूचा आंबा बाजारात आल्यानंतर मालावीची मागणी कमी होते. यानंतर लगेचच देवगड व रत्नागिरी हापूसही बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यात मालावी हापूसची मोठी विक्री होते.
हापूस आंब्याचा आस्वाद देणारा ‘मालावी अल्फान्सो’
हापूस आंब्याचा आस्वाद देणाराच मालावी अल्फान्सो असल्याने तो भारतातील ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या मध्यम आकाराच्या 20 नगांच्या बॉक्सची किंमत 3600 रुपये तर मोठया आकाराच्या आंबाच्या 20 नगांच्या बॉक्सची किंमत 4600 रुपये आहे. कोल्हापूर बाजार समितीत बुधवारी 15 बॉक्सची आवक झाली. तत्काळ या बॉक्सची विक्रीही झाली. कोल्हापूरकरांच्या पसंतीस हा आंबा उतरला आहे.
प्रसाद वळंजू, आंबा व्यापारी








