पुणे : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य करण्याबरोबर बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनियरने केले असल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आले आहे.
पुणे पोलिसांच्या कोथरूड बीट मार्शलवरील कर्मचार्यांनी गस्तीत दुचाकी चोरीच्या संशयातून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (वय-२४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली. दरम्यान, पुण्यात या दोघांना आश्रय देणार्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला तर, नुकतीच या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून सिमाब नसरूद्दीन काझी (वय २७, कौसरबाग, कोंढवा, मूळ. पंढेरी, रत्नागिरी) या आयटी इंजिनियरला अटक करण्यात आली. त्याच्याकडील चौकशीत त्याने रोख व ऑनलाईन अशी पैशाची मदत केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.