गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील साखरी आगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. पाण्यात सूर मारल्यानंतर झटपट पाण्याबाहेर न आल्याने पाणी पोटात गेल्यावर मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
प्रज्ज्योत उदय मेहता, वय 24 वर्ष राहणार गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ जागकरवाडी असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे गुहागर पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी उशिरा याबाबतची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी प्रज्योत आपल्या चौघा मित्रांसोबत साखर आगार कातळवाडी येथील तळ्यावर सायंकाळी ४ च्या दरम्यान पोहायला गेला होता. सुमारे दीड ते दोन तास सर्वांनी पोहण्याचा आनंद लुटला. त्यानंतर ते तळ्यातून बाहेर आले. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा तळ्यात उतरण्याचा मोह झाला. या मोहानेच घात केला. एका बाजूला तिघे मित्र उभे असताना प्रज्ज्योत याने दुसऱ्या बाजूने तळ्यात सुर मारला. बराच वेळ तो पाण्यातून वर येत नसल्याने इतर तिघांनी तळ्यामध्ये उडी घेत त्याचा शोध घेतला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. पोटात गेलेले पाणी बाहेर काढूनही तो हालचाल करत नव्हता. अखेर एका खाजगी वाहनाने मित्रानी त्याला हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉ. चंद्रकांत कदम यांनी सांगितले. या घटनेची गुहागर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
शव विच्छेदनामध्ये त्याच्या अंगावर कोणती जखम नव्हती यामुळे त्याला वेळीच पाण्याबाहेर न येता आल्याने पाणी पोटात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल तडवी, किशोर साळवी या प्रकरणी अधिक तपास करत आहे.