नामांकित कंपनीत नोकरीचे दिले हेते आमिष; रत्नागिरी पोलिसात गुन्हा दाखल
रत्नागिरी प्रतिनिधी
नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून तरूणाला सुमारे 12 लाख 40 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना खात्रीशीर माहिती घेवून करावी, असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत असतानाही फसवणुकीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. राहूल देवजी खापले ( 22, रा. चिंचवाडी-देऊड ) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी राहूल याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर 2022 रोजी रोशनसिंग नावाच्या व्यक्तीने राहूल खापले याच्या मोबाईलवर फोन केला. आपण नोकरी डॉट कॉम या कंपनीचा अधिकारी बोलत असून तुम्हाला महिंद्र ॲण्ड महिंद्रा या कंपनीत नोकरीला लावतो, असे आमिष राहूल याला दाखवण्यात आले. नोकरीसाठी नोकरी डॉट कॉमच्या खात्यात 2 लाख 38 हजार 888 पैसे भरावे लागतील, अशी बतावणी रोशनसिंग नावाच्या व्यक्तीने केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राहूल याने सांगितलेल्या खात्यावर ही रक्कम जमा केली. यानंतर 9 डिसेंबर 2022 ते 3 फेबुवारी 2023 या कालावधीत कनक, अभिषेक, समंथा, राजेश्वर या व्यक्तींनी राहूल याच्या मोबाईल वारंवार फोन केला. तसेच तुमची महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी निवड झाल्याचे राहूल याला सांगण्यात आले. नोकरीच्या प्रोसिजरची कारणे सांगून राहूल याला आणखी 10 लाख 1 हजार 851 रूपये खात्यामध्ये भरावयाला सांगण्यात आले. त्यानुसार राहूल याने ही रक्कम सांगितलेल्या खात्यामध्ये जमा केली.
यानंतर संबंधित इसमांकडून राहूल याच्या मोबाईलवरील ॲपवर व इमेलवर काही कागदपत्रे पाठवून दिली. ही कागदपत्रे बनावट असल्याचे समोर येताच आपली फसवणूक झाल्याचे राहूल याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने रत्नागिरी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित फसवणूक करणाऱ्यांविरूद्ध भादंवि कलम 420,465 सह 34 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 सी नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.