लांजा पोलीसांनी पनवेल पोलीसांच्या माध्यमातून दिले कुटुंबीयांच्या ताब्यात
लांजा: प्रतिनिधी
पनवेल येथून घरातून पळून आलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना लांजा पोलिसांनी आडवली रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेत पनवेल पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल कामोठे येथून दोन अल्पवयीन मुले कोणालाही न सांगता घरातून पळून आली होती. गुरुवारी १० ऑगस्ट रोजी आडवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्टेशन मास्तर गौतम गांधी यांना आढळून आली होती. याबाबत त्यांनी त्यांच्याकडे तिकिटाचे विचारणा केली असता त्यांच्याकडे तिकीट नव्हते. त्यामुळे स्टेशन मास्तर गौतम गांधी यांना त्यांचा संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ लांजा पोलीस स्थानकाला दिली. तसेच याबाबतची माहिती पोलिसांच्या ११२ नंबर व्हॅनवर दिली. यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला कॉन्स्टेबल एकता कदम यांनी आडवली रेल्वे स्टेशन येथे जावून त्या दोघा अल्पवयीन मुलांची चौकशी करून ताब्यात घेतले.
त्यानंतर लांजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी ती दोघेही पनवेल कामोठे येथील असल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर लांजा पोलिसांनी पनवेल कामोठे पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी हे दोघे घरातून गायब झाल्याचा गुन्हा बुधवारी ९ ऑगस्ट रोजी पनवेल कामोठे पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लांजा पोलिसांनी पनवेल कामोठे पोलिसांशी संपर्क साधून त्या दोघाही अल्पवयीन मुलांना त्यांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, याकामी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरीष भोसले, हेड.कॉन्स्टे. दिनेश आखाडे, महिला कॉन्स्टेबल एकता कदम, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार यांनी कामगिरी बजावली.









