रायगड / प्रतिनिधी
पावसाळी पिकनिक जीवावर बेतल्याची घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये पाबळ या गावात घडली आहे. रेवदंडा येथील दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.१७) सायंकाळी घडल्याने तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, थेरोंडा रेवदंडा, ता. अलिबाग (रायगड) येथून चार तरुण पावसाळी पिकनिक साठी पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी ( ता.१७) आले होते. पाबळ येथील बरडावाडी परिसरात नदीमध्ये पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने इलान बेंजामीन वासकर ( वय २५) व इजरायल बेंजामीन वासकर ( वय २२) हे दोन सख्खे भाऊ वाहून गेले.
या बाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला असता दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत.