तिघांना गोव्यातून घेतले ताब्यात : 4 लाखाच्या रोकडसह इनोव्हा कार हस्तगत : अन्य दोघे संशयित फरार
प्रतिनिधी/रत्नागिरी
चिपळूण शहरातील भोगाळे येथील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या गोव्यातून 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघेजण पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाले. दरम्यान पोलिसांनी चोरीतील 4 लाख रूपयांची रोकड व चोरीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार हस्तगत केली. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी.
इरफान आयुब खान (39), वासिफ साबीर अली (25) व शादाब मकसुद शेख (35, रा.सर्व मुंबई मुळ उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी संशयितांना न्यायालयापुढे हजर केले असता 12 सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी चिपळूण भागोळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले होत़े तसेच आतील 14 लाख रूपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.









