रायगड : प्रतिनिधी
जमिनीचा फेरफार उतारा देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्या विरोधात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी २६ जूलै रोजी करण्यात आली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की , संतोष मनोहर चांदोरकर ( ४३ ) असे या तलाठ्याचे नाव आहे. हा तलाठी रोहा येथील रहिवासी असून रोहा तालुक्यातील भालगाव येथे तलाठी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या अतिरिक्त कार्यभार वाली येथे होता. तक्रादाराने गट नं. ७८३ मधील क्षेत्र 01- 99- 00 या जमीनीचे फेरफार नोंद मंजूरीसाठी अर्ज केला होता. फेरफार नोंद मंजूर झाल्यानंतर तलाठ्याकडे उताऱ्याची मागणी केली. परंतु या तलाठ्याने ३० मे २०२३ रोजी दहा हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलाठ्याच्या विरोधात तक्रार केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, कौस्तूभ मगर, जितेंद्र पाटील, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील या पथकाने पडताळणी केली.
पडताळणीमध्ये दहा हजार रुपयांची मागणी केल्याबरोबरच ती रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे २६ जूलै रोजी संतोष चांदोरकर या तलाठ्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीदेखील महाड शहर पोलीस ठाणेमध्ये २०१६ व २०१९ मध्ये लाच प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.