मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वादाच्या भोवध्यात अडकलेल्या वकील व बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य ॲड. निलिमा चव्हाण यांना हायकोर्टाने दणका दिला. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाण यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर स्थानकात रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली होती. निलिमा या मानसिक त्रास देत असल्याने आपल्या वडिलांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असे मोरे यांच्या मुलाने जबानीत म्हटले त्यानुसार जीआरपीने निलिमा यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
मुंबई सत्र न्यायाधिश एम जी देशपांडे यांनी अॅड. चव्हाण यांचा गेल्याच आठवड्यात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.