खेर्डी ते पोफळीदरम्यान गाळ उपसाच्या हालचाली; खर्चिक तिसरा टप्पा बारगळण्याची चिन्हे
चिपळूण प्रतिनिधी
पावसाळ्यापूर्वी शहरातून वाहणाऱया वाशिष्ठी, शिवनदीत जलसंपदा विभागासह नाम फाऊंंडेशनच्या माध्यमातून गाळ उपसाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता खेर्डी ते पोफळी दरम्यानच्या दुसऱया टप्प्यातील गाळ उपसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्यतो दिवाळीनंतर गाळ काढण्यास प्रारंभ होणार असल्याचे सांगितले जात असले तरी डिसेंबर उजाडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर तिसरा टप्पा गोवळकोट ते बहिरवली दरम्यानचा असून तो खर्चिक असल्याने तो तूर्तास बारगळण्याची चिन्हे आहेत.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात चिपळूण शहर, परिसराची मोठी आर्थिक तसेच जीवित हानी झाली. त्यामुळे या महापुराला कारणीभूत असलेल्या नद्यांतील गाळाचा प्रश्न पुढे आला. पुढे त्यातूनच शहरवासियानी जनआंदोलन उभारले. यातूनच आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने गाळ उपसासाठी साडेनऊ कोटीचा निधी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. मंत्रालयस्तरावर झालेल्या उच्चस्तरीत बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी वाशिष्ठी नदीतील प्रवाहाला ठरणारे अडथळे, बेटे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. त्यानंतर जलसंपदा विभागाने राज्यभरातील यंत्रसामुग्री येथे लावून वाशिष्ठीतील गाळ उपसा सुरू केला.
गाळ उपसासाठी जलसंपदा विभागाने प्रथम प्राधान्याने नॉन सीआरझेड व सरकारी जागेतील टप्पा 1 व 2मधील व तद्नंतर सर्व वैधानिक मान्यतेसह मेरीटाईम बोर्डमार्पत सीआरझेड क्षेत्रातील टप्पा 3 मध्ये असे तीन टप्प्यात वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे नियोजन केले. गतवर्षी 26 डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा सुरू झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नाम फाऊंडेशनतर्फे शिवनदीतील फणसवाडी धरणाच्या खालील बाजूस, पागमळा, नगर परिषद हद्द, वाशिष्ठी नदीवरील उ‹ाड याठिकाणी 2 लाख 5 हजार 222 घनमीटर, जलसंपदा विभागाकडून बहादूरशेख नाका ते पेठमाप वालोपेपर्यंत 5 लाख 19 हजार 382 घनमीटर, मुंबई-गोवा राष्ठ्रीय महामार्ग कंत्राटदारामार्पत बहाद्दूरशेख नाका येथील बेटावरील सुमारे 3 हजार 500 घनमीटर असे एकंदरीत 7 लाख 6 हजार घनमीटर गाळ काढला गेला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे.
दुसऱ्या टप्प्यात खेर्डी ते पोफळी
पहिल्या टप्प्यातील गाळ उपसानंतर दुसऱ्या टप्प्यात खेर्डी मेडिकल काŸलेज ते पोफळी (जलसंपदा विभाग), तर तिसरा टप्पा गोवळकोट ते बहिरवली (मेरिटाईम बोर्ड) या टप्प्यातील गाळ काढला जाणार आहे. गतवर्षी गाळ उपसासाठी दहा कोटीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. त्यातील जवळपास 50 टक्के निधी पहिल्या टप्प्यावर खर्च झाला आहे. उर्वरीत दुसऱया टप्प्यासाठी निधी उपलब्ध असल्याने साहजिकच दिवाळीनंतर गाळ उपसाला सुरूवात केली जाईल असे चित्र आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बचाव समिती पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे.
तिसरा टप्प्या खर्चिक
गाळ उपसाचे दोन्ही टप्पे सहज सोपे असले तरी गोवळकोट ते बहिरवली हा तिसरा टप्पा हा खाडीतील असल्याने तो प्रचंड खर्चिक आहे. शिवाय हा गाळ उपसा मेरीटाईम बोर्डच्या अखत्यारित असल्याने त्यासाठीच्या परवानग्या मिळणे सहज सोपे नाही. शिवाय मंत्रालयस्तरावर याबाबतचा अधिक पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यामुळे सुरूवातीच्या दोन टप्प्यांपेक्षा तिसरा टप्पा अधिक खर्चिक आणि काहीसा गुंतागुंतीचा आहे.









