खेड : प्रतिनिधी
कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची बिघडलेल्या वेळापत्रकाची परिस्थिती सोमवारीही कायम राहिल्याने गाव गाठताना गणेशभक्तांना यातायात करावी लागली. 7 ते 8 तास विलंबाने धावलेल्या गणपती स्पेशल गाड्यांमुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तुफानी गर्दीत विलंबाच्या प्रवासाची भर पडून झालेल्या रखडपट्टीने चाकरमान्यांची दमछाक झाली. निजामुद्दीन-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस सह एलटीटी-मंगळूर गणपती स्पेशल 7 तासाहून अधिक वेळ विलंबाने धावल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणपती स्पेशलसह नियमित गाड्या त्या-त्या स्थानकातून उशिराने सुटत असल्याने या फटका चाकरमान्यांना बसत आहे. आधी गर्दीतून रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना गणेशभक्तांची चढाओढ सुरू असताना त्यात रखडपट्टीच्या प्रवासाने चाकरमानी मेटाकुटीस आले आहेत.