महिला आणि विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्याचा; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
लांजा प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील सापुचेतळे ते खानवली या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे झाले आहे. संबधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा- संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस; बाजारपेठाना पुराचा धोका वाढला
तालुक्याच्या पश्चिम विभागातील सापुचेतळे ही बाजारपेठ असून याठिकाणी उच्च माध्यमिक पर्यंत कॉलेज आहे. यासह १० ते १५ गावांसाठी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक सापुचेतळे येथे आहे. वर्दळीच्या या मार्गावर नियमित वाहतूक सुरू असते. मात्र सापुचेतळे ते खानवली या राज्यमार्गाची गेली पाच ते सहा वर्षपासून अक्षरशः चाळण झाली आहे. हा मार्ग प्रवासी वर्गासाठी जीवघेणा ठरत आहे. तर वाहन चालकानं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. रस्त्याच्या बाजूला गटारे नसून मोठं मोठे खड्डे पडले आहेत. खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे गाडी चालवताना चालकाला अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत स्थानिक जनतेने वेळोवेळी बांधकाम विभागाकडे दुरुस्ती किंवा डागडुजी करण्याची मागणी केली होती. निधी नसल्याचे कारण देत या लोक मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आज या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. या मार्गावरून आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे
या सापुचेतळे ते खानवली या ७ किलो मीटर लांबीच्या मार्गाची त्वरित दुरुस्ती किंवा डागडुजी करा. अन्यथा स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निर्मल ग्रामपंचायत भडेचे सरपंच सुधीर तेंडुलकर यांनी दिला आहे.