रत्नागिरी :
प्रत्येक जिल्ह्यातून ‘एक जिल्हा – एक उत्पादन’ निवडून त्या उत्पादनाचे ब्रँडींग करणे व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना जाहीर केली. या योजनेत रत्नागिरी जिह्याने गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्यामुळे 2024 चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिह्याला जाहीर झाला. पेंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये झालेल्या समारंभात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाचा विकास, मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती व बाजारातील यशस्वी सादरीकरण करणाऱ्या जिह्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो. या पुरस्कारामुळे जिह्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख, उत्पादनासाठी नवीन बाजारपेठांची उपलब्धता, उद्योग व कारागीरांना रोजगार व प्रशिक्षण, पर्यटन व आर्थिक विकासाला चालना इत्यादी फायदे रत्नागिरी जिह्याला होणार आहेत.
या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावरून केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहिल्यानगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे व गोंदिया या 14 जिह्यांची निवड झाली होती.
यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सह व्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी 26 डिसेंबर रोजी रत्नागिरी जिह्याला भेट देऊन हापूस आंबा या उत्पादनाशी निगडित उद्योगांना भेट देऊन आढावा घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले होते.
रत्नागिरी पाठोपाठ नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यांना पुरस्कार मिळाले. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा विशेष उल्लेख केला. या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर हे उपस्थित होते.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन्ही योजनांमध्ये रत्नागिरी जिह्याने सन 2023-24 व 2024-25 या सलग दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर राहिला आहे.








