राजापूर प्रतिनिधी
तालुक्यातील बहुचर्चित अशा रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या सहाजणांना अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यात सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, दीपक जोशी, सतीश बाणे, अमोल बोळे, नितीन जठार यांना या नोटीसा बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प युती सरकारच्या काळात रद्द झाल्यानंतर हा प्रकल्प बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. तत्कालीन ठाकरे सरकारनेही बारसू, सोलगाव येथील जागेला हिरवा कंदील दिला होता. मात्र या प्रकल्पाला बारसू, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द परिसरातील ग्रामस्थांतून विरोध असून प्रकल्प विरोधकांनी यापूर्वी प्रकल्पाविरोधात अनेकदा आंदोलनेही केली आहेत. काही महिन्यांपूर्वी या परिसरात ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. या सर्व्हेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.
सर्व्हेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांना अडवणे, त्यांच्या साहित्याची नासधूस करणे व त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकारही प्रकल्पविरोधी आंदोलकांकडून घडला होता. या प्रकारांमुळे प्रकल्पविरोधी आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता प्रकल्पविरोधी आंदोलन करणाऱ्या 6 प्रमुख पदाधिकाऱ्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. यात सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, दीपक जोशी, सतीश बाणे, अमोल बोळे, नितीन जठार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.









