रत्नागिरी :
आगामी गणेशोत्सव आणि जन्माष्टमीच्या उत्साही वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, नागरिकांनी निर्भयपणे सण साजरे करावेत आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीला प्रभावीपणे तोंड देता यावे, यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने आपली सज्जता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मॉकड्रीलद्वारे पोलिसांच्या दंगल नियंत्रणाच्या क्षमतेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी वास्तववादी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. ही मॉकड़ील म्हणजे एक सराव नव्हता, तर रत्नागिरी पोलिसांच्या ‘तयारी’ची व ‘खबरदारी’ची एक प्रभावी झलक होती.
मंगळवारी चंपक मैदानात एका व्यापक दंगल नियंत्रण सरावाचे (मॉब कंट्रोल एक्सरसाईज) यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित करण्यात आला होता. हा सराव राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३.४५ वाजता सुरू झाला व सायंकाळी ४.४५ वा. यशस्वीपणे पूर्ण झाला. १ तास चाललेल्या या सरावात कुळसंगे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक हालचालीचे बारकाईने निरीक्षण केले. या सरावात एकूण ९० पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या जोडीला ४ वाहने, ९० लाठ्या, ९० हेल्मेट, ३० शिल्ड (ढाली), १० एसएलआर रायफल्स, १ मेगाफोन, ९० गॅस गन, १ पॉईंट २/२ रायफल, १ स्ट्रेचर आणि १ १२ बोअर रायफल अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला.
- वास्तववादी प्रशिक्षणातून वाढीव क्षमता
सरावादरम्यान पोलिसांच्या दंगल नियंत्रणाच्या क्षमतेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी वास्तववादी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव मिळतो व त्यांना योग्यवेळी, योग्य प्रतिसाद कसा द्यायचा, याचे प्रशिक्षण याद्वारे देण्यात आले.








