राजापूर प्रतिनिधी
मोबाईल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून मोबाईल क्रमांकाचे रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागून घेत बँक खात्यावरील सुमारे अडीज लाख रूपये लंपास केल्याची खळबळजनक घटना राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील सौदागर अंबाजी विचारे यांच्या बाबतीत घडली आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवीहसोळ, गणेश मंदीरवाडी येथील सौदागर अंबाजी विचारे ( ६१ )यांना मोबाईलवर एका अज्ञाताचा फोन आला. त्याने आपण एम.टी.एन.एल. कार्यालयातून बोलत असून मोबाईल नंबरचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक सांगा, असे विचारे यांना सांगितले. त्यामुळे विचारे यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक संबंधिताला सांगितला. त्यानंतर विचारे यांच्या बँक खात्यातून सुमारे २ लाख ४९ हजार ९८९ रूपये ट्रान्सफर करण्यात आले.
दि. १५ ते १७ ऑगस्ट २०२२ दररम्यान हा गुन्हा घडला असून याबाबत विचारे यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. अरूण दास या संशयिताविरोधात भा.दं.वि. कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.