पोलीस स्थानकात तक्रार, कर्मचाऱ्यांकडून धनादेशांमध्ये फेरफार केल्याचा आरोप, नगर पंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
दापोली प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याकडून दापोली नगर पंचायतीतील धनादेशांमध्ये फेरफार करून सुमारे दीड कोटींचा अपहार झाल्याची चर्चा दापोली सुरू आहे. या बाबत दापोली पोलीस स्थानकात नगरपंचायतीच्यावतीने तक्रार देखील देण्यात आली आहे. दापोली पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकाकडून देण्यात आली. मात्र या प्रकारामुळे दापोली नगर पंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दापोली नगर पंचायतीच्या स्थापनेपासून नगर पंचायतमध्ये अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यातील बरेचसे कर्मचारी अस्थायी स्वरूपाचे आहेत. ते जरी नगर पंचायतमध्ये काम करत असले तरी ते ठेका पद्धतीने काम करतात. असे असले तरी त्यांच्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे बरेचसे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.यातील एका कर्मचाऱयांने आपल्याकडील धनादेशांचा नगर पंचायतीच्या आपल्याकडील धनादेशांमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत आहे. या कर्मचाऱ्याने देणे असलेल्या धनादेशावर चार आकडी रक्कम टाकून मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची सही घेतली. यानंतर चार आकडी आकड्याच्या आधी आणखी दोन आकडे टाकले. यामुळे ही रक्कम फुगली. शिवाय ही रक्कम एका खाजगी संस्थेला अदा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. शिवाय हा प्रकार बरीच वर्ष सुरू होता. यामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
‘तो’ कर्मचारी नॉट रिचेबल
या बाबत दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्प होऊ शकला नाही. सध्या हा कर्मचारी नॉट रिचेबल आहे. शिवाय त्याचे भारताबाहेर परदेशात दुबई व थायलंड येथेही सदनिका असल्याची चर्चा दापोली सुरू आहे. शिवाय या व्यचे मुंबई, पुणे, दिली येथेही सदनिका असल्याची चर्चा दापोली सुरू आहे.
पोलिसांकडून दुजोरा
दापोली पोलीस स्थानकाशी या बाबत संपर्क साधला असता दापोली नगर पंचायतीने तक्रार दिल्याचे सांगितले. शिवाय या बाबत भरपूर कागदपत्र तपासण्याची गरज आहे. ते काम सुरू असल्याची माहिती पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली. शिवाय गेले आठवडाभर दापोली नगर पंचायतीच्या वरच्या मजल्यावर कोणासही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रशासनाकडून वरचा मजला बंद करण्यात आल्याने अनेक तर्पवितर्प लढवले जात आहेत.









