काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. मान्सूनच्य़ा आगमनाची चाहूल लागताच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यानंतर हवामान खात्याने हि चेतावणी दिली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये 104 मिमी, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 123 मिमी आणि 139 मिमी पाऊस झाला आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता असून पुढील 5 दिवसांत मुसऴधार पाऊस पडणार आहे,” असे RMC ने म्हटले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई शहराचा काही भाग जलमय झाला असून पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या भागातील वाहतूक स्वामी विवेकानंद रस्त्यावर (एसव्ही रोड) वळवण्यात आली. भारतीय हवामान खात्याने (IMD) 60 मिमी ते 200 मिमी पर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून पुढील 24 तासांसाठी मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला होता.
अवघ्या तीन तासांत शनिवारी शहरात 88 मिमी पावसाची नोंद झाली. संध्याकाळी 5 वाजता, IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात (मुंबईचे बेस स्टेशन) फक्त 27.8 मिमी पावसाची नोंद झाली होती, रात्री 8.30 पर्यंत 115.8 मिमी पावसाची नोंद झाली होती.
अधिक माहीती देताना IMD ने कालचा पाऊस सक्रिय मान्सून प्रवाहाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की नैऋत्य मान्सूनचा प्रवाह २४ तासांपूर्वी सक्रिय झाला असून त्यामुळे दक्षिण कोकणातील काही भागात जोरदार पाऊस झाला.









