प्रतिनिधी रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’ ने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले आहे. तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला आहे.
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 11 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बाजार समितीसाठी सहकार पॅनलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस, ठाकरे सेना असे सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र, तीन अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक घ्यावी लागली. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्या प्रकियेत 11 हजार 110 मतदानापैकी 3 हजार 415 म्हणजे एकूण 32.37 टक्के मतदान झाले.
कमी मतदान झाल्याने निवडणुकीत काँटे की टक्कर होणार का काय याकडे लक्ष वेधले होते. शनिवारी 29 एप्रिल रोजी या मतदानाचा निकाल लागला. त्यावेळी कोणाच्या गळ्यात संचालकपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनेलचेच वर्चस्व दिसून आले. सहकार पॅनलचे हेमचंद्र माने (भाजप), गजानन पाटील (शिंदे सेना), सुरेश कांबळे (राष्ट्रवादी) हे तीन संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अरविंद आंब्रे (राष्ट्रवादी), विजय टाकळे ( राष्ट्रवादी), मधुकर दळवी (शिंदे सेना), नैनेश नारकर (ठाकरे सेना), रोहित मयेकर (शिंदे सेना), सुरेश सावंत (राष्ट्रवादी), संदीप सुर्वे (ठाकरे सेना), स्मिती दळवी ( राष्ट्रवादी) , स्नेहर बाईत (ठाकरे सेना), ओंकार कोलगे (शिंदे सेना), प्रशांत शिंदे (ठाकरे सेना) उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील दोन जागांसाठी उमेदवारी अर्जच आला नव्हता. व्यापारी व अडतेमधून एक जागेसाठी आलेला अर्ज छाननीत बाद झाल्याने ३ जागा रिक्त राहिल्या आहेत आहेत.