शाहुवाडी प्रतिनिधी
कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर रविवारी पहाटे पाच वाजता पलटी झालेला गॅस टँकर काढण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला बारा तासाच्या अथक परिश्रमा नंतर यश आले .पूर्ण दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती . शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा सतर्क झाली होती . घटना स्थळी हायवे पोलीस देखील दाखल झाले होते .
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या दरम्यान रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने गॅस भरलेला टँकर जात होता . सदर टँकर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर जुळेवाडी खिंडी नजीक समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना रस्त्याच्या बाजूला पलटी झाला .गॅस टँकर पलटी झालेल्या ठिकाणच्या रस्त्यालाही भेग पडलेली दिसत आहे .पहाटेच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याची बातमी पसरताच परिसरात घबराट निर्माण झाली . घटनेचा गांभीर्य ओळखून शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करून कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती .
पलटी झालेल्या गॅस टँकरला गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . मात्र प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदर गॅस लिकेज बंद करण्यासाठी विशेष यंत्रणा सतर्क ठेवली होती .क्रेन ,जेसीबी मशीन , व दुसरा रिकामा गॅस टँकर , मॅकेनिक ,आदींच्या साह्याने पलटी झालेल्या टँकर सुरळीत करण्यात आला . दरम्यान दिवसभर या मार्गावर वाहतूक बंद राहिल्याने वाहनधारकासह नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते .गॅस पलटी झालेल्या परिसरात मलकापूर नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी त्याचबरोबर रुग्णवाहीका उपस्थित होत्या.
या मार्गावर गॅस कंपन्यांची अत्यावश्यक सेवा उपलब्ध असणे गरजेचे
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर नेहमीच गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची वर्दळ सुरू असते . अनेक वेळा अपघात सदृश्य घटना घडल्या आहेत . मात्र आंबा ते बांबवडे या मार्गावर गॅस कंपनीची कोणत्याही अत्यावश्यक सुविधा यामध्ये क्रेन ,जेसीबी ,गॅस पलटी झाल्यानंतर होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक असणारे मेकॅनिक ,अग्निशामक दलाची गाडी यांची अत्यावश्यक असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र गॅस कंपन्यांनीनी या मार्गावर उभा करणे गरजेचे आहे . किंबहुना अशा विपरीत घटना घडल्यानंतर तात्काळ या मार्गावरील वाहतुकीसह पुढील धोका टाळण्यास सोयीच होणार आहे . याकडे गॅस कंपन्यांनी अधिक लक्ष देण्याची चर्चा नागरिकांच्यातून पुढे येत आहे .
या मार्गावरील चौथी घटना
कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग व मलकापूर अनुस्कुरा मार्गावर देखील अशीच गॅस पलटी झाल्याची घटना घडली होती .तीन महिन्यापूर्वी वारूळ येथे गॅस पलटी होऊन अचानक चालकाच्या केबिनने घेतलेली पेठ आणि त्या ठिकाणी चालकाची झालेली दुर्दैवी गंभीर परिस्थिती या आठवणी यावेळी जाग्या झाल्या यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते .मात्र पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी तात्काळ घटनास्थळी यंत्रणा सतर्क केल्याने पुढील अनर्थ टळला .बारा तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर पलटी झालेला गॅस टँकर सुरळीत करून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली .शाहुवाडी पोलीस व होमगार्ड यांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष परिश्रम घेतले .









