मुंबई- गोवा महामार्गासह, बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर पथके कार्यरत
रत्नागिरी प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल झालेले आहेत अजूनही येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर साथींच्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी गेल्या दोन दिवसांत गावाकडे येणाऱ्या 1262 चाकरमान्यांची आरोग्य पथकांकडून मुंबई-गोवा महामार्गावर चौकशी करण्यात आली. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकला असलेले 21 चाकरमानी आढळले. त्या तपासणीत 66 चाकरमान्यांना उपचाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या दिमतीला मुंबई-गोवा महामार्ग असेल वा अन्य महामार्ग जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी केंद्रे सुरू केलेली आहे. जिल्ह्यात 16 सप्टेंबरपासून आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे चाकरमान्यांची तपासणी व त्यांना पतिबंधात्मक उपचार, तसेच खबरदारीविषयी मागदर्शन दिले जात आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत चाकरमान्यांच्या वाहनांची चौकशी करून त्यांची आजारासंबंधी विचारपूस केली जात आहे.
गावात हजारोंच्या संख्येने येणाऱ्या या चाकरमान्यांना डेंग्यूसह ताप, डोळे येणे या आजारांच्या पार्श्वभूमीवर खबरदार करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्ग तसेच 23 ठिकाणी आरोग्य पथके तैनात झाली आहेत. शनिवारपासून सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेत 17 सप्टेंबर पर्यंत 1262 चाकरमान्यांची तपासणी करण्यात आली. पैकी ताप, सर्दी, खोकला असलेल्यांची संख्या 21 इतकी आढळून आली. तर इतर आजार असलेल्यांमध्ये 45 जण तर 66 जणांवर उपचार करून त्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य पथकांमार्पत करण्यात आले आहे.