शिरगावमध्ये सरपंच महाविकास आघाडीचा तर बहुमत शिंदे गटाकडे राहिले.
Ratnagiri Gram Panchayat Result 2022 : ग्रामपंचायतीच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे तीनही सरपंच भरघोस मतांनी निवडून आले. सदस्य निवडून येण्यात देखील उध्दव सेना आघाडीवर राहिली. शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडीत शिंदे सेनेचा वरचष्मा राहिला. पण या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेने बालेकिल्ला काबीज केल्याचे या निकालातून समोर आले.शिरगावमध्ये सरपंच महाविकास आघाडीचा तर बहुमत शिंदे गटाकडे राहिले.
रत्नागिरीतील बहुचर्चित शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सरपंच पदावर महा विकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी या ३०० मतांनी विजयी झाल्या. मात्र १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले. शेवटच्या फेरी पर्यंत निवडणूक रंगतदार झाली. सरपंच पदासाठी कांटे की टक्कर झाली. अखेर फरीदा काझी या सरपंच पदावर विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार सौ. मोरे यांनी या निवडणुकीत सरपंच पदासाठी १७०० मते घेतली. फरीदा काझी यांनी २ हजार ६०, कुमठेकरांनी १ हजार ७५० मते घेतली.
फणसोप ग्रामपंचायती वर उद्धव ठाकरे सेनेच्या राधिका साळवी विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा- कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच विजयी
फणसोप ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे यांच्या सेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मत मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मत मिळाली. राधिका साळवी या ३६४ मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली.
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीवर देखील उद्धव ठाकरे गटाचा सरपंच निवडून आला. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या सौ. बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.