गणेश चतुर्थीच्या दिवशी “वेळ आली होती पण काळ आला नव्हता”
गणपतीपुळे वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे बुधवारी ३१ रोजी गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी पुणे- चाकण येथील तरुणाला मरणाच्या दाढेतून बुडताना वाचवण्यात गणपतीपुळे येथील सागर रक्षक दलाचा सदस्य शरद उर्फ शेऱ्या मयेकर, रा.मालगुंड- भंडारवाडा याने वाचवले. यावेळी त्याच्या मदतीसाठी गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी अमेय केदार व मिथुन माने व अन्य कर्मचाऱ्यांरी धावून गेले.
गुलशन सुधाकर राठोड (28 मूळ राहणार पानोला, तालुका माहूर, जिल्हा नांदेड ) येथील हा तरूण सध्या पुणे, चाकण येथे एका कंपनीमध्ये कामाला आहे. यावेळी तरुणाला पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ नेण्यात आले. पुणे चाकण येथून बेलफी वायरिंग हायर्नेस कंपनीचे एकूण वीस तरुण गणपतीपुळे येथे आज बुधवारी गणपतीपुळे येथे आले होते. मंगळवारी 30 रोजी पुणे चाकण या ठिकाणाहून ते निघाल्यानंतर गणपतीपुळे येथे सकाळी 11 वाजता बुधवारी 31 रोजी पोहोचले.मात्र या सर्व तरुणांना देवदर्शन झाल्यानंतर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता त्यातील गुलशन सुधाकर राठोड हा खोल समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी गेला असता बुडू लागला. यावेळी त्याच्या सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला असता गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे सागररक्षक दलाचा सदस्य शरद अशोक मयेकर राहणार मालगुंड भंडारवाडा याने क्षणाचा ही विलंब न लावता आपल्या ठिकाणी असलेले रिंग बोये घेऊन तात्काळ समुद्रात उडी घेतली आणि खोल समुद्रात बुडणाऱ्या गुलशन राठोडपर्यंत पोहचून त्याला खोल समुद्रात बुडत असताना समुद्राबाहेर काढले. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचार करून तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
तरुणाला वाचवणाऱ्या शरद उर्फ शेऱ्या मयेकर याच्या कौतुकास्पद कामगिरीची तात्काळ दखल घेऊन जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्रामध्ये रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, कॉन्स्टेबल मधुकर सरगर, प्रशांत लोहळकर, सागर गिरीगोसावी, महिला कॉन्स्टेबल वंदना लाड आदींसह जयगड पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.