रत्नागिरी प्रतिनिधी
पाच दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारी गौरी-गणपतींचे वाजतगाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 234 घरगुती तर 17 सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत भक्तगणांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
7 सप्टेंबर रोजी वाजतगाजत अगदी पारंपरीक पद्धतीने जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे आगमन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. बुधवारी गौरीपूजन करून जिल्हाभरात सर्वत्र सण साजरा करण्यात आला. गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्हाभरात 1 लाख 66 हजार 867 घरगुती तर 112 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तगणांनी गौरी-गणपतीचा सण उत्साहात साजरा केला. घरी आलेल्या बाप्पाचे आणि गौराईचे स्वागत जेवढ्या जल्लोष आणि जोशात झाले तेवढ्याच उत्साहात मात्र हळव्या अंत:करणाने गणेशभक्तांनी गुरुवारी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका, परटवणे आदी भागातील गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावली होती. अनेक जणांनी वाहनातून गणपती नेत दुपारीपासून विसर्जनासाठी किनारा गाठल्याचे चित्र होते.
रत्नागिरी शहरातन या पाच दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनासाठी येथील मांडवी चौपाटीवर पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षारक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी कार्यकर्ते यांच्या मदतीने विसर्जन सोहळा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. विसर्जन मिरवणुकांना पारंपरिक ढोल-ताशांच्या गजराचा थाट पहावयास मिळाला. मांडवी समुद्र किनारी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी फार मोठी गर्दी झालेली होती. येथील विसर्जन घाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मांडवी किनाऱ्यासह भाट्योकिनारी देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनावेळी मांडवी येथील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचंही नियोजन केले होते. पांढरा समुद्र किनारीसुद्धा गणेश विसर्जनासाठी फार मोठी गर्दी झाली होती.
जिह्यातील समुद्र किनाऱ्यांबरोबरच, नदी, तलाव आदी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे पारंपरिक आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. शहरी भागात मांडवी चौपाटी, किल्ला, भाट्यो, पांढरासमुद्र, मिऱ्या, कर्ला, राजीवडा, पांढरासमुद्र आदी भागात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. नजिकच्या ग्रामीण भागातील गणपतींचे मिऱ्याबंदर, काळबादेवी, साखरतर, आरेवारे, शिरगांव, मिरजोळे, नाचणे, पोमेंडी, सोमेश्वर, फणसवळे, हातखंबा, गोळप, विसर्जन लहान मोठ्या नद्यांतील डोहांमध्ये तसेच समुद्रकिनारी देखील पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
रत्नागिरीत दुकाने, पेट्रोलपंप ठेवले बंद
रत्नागिरी शहरात गणपती गौरींच्या विसर्जन विसर्जनानिमित्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट पसरलेला होता.गणपती विसर्जनानिमित्त सार्वजनिक सुट्टीही प्रशासनाच्यावतीने जाहीर केलेली होती. तर यादिवशी सकाळपासूनच येथील बाजारपेठेतील वर्दळ मंदावलेली होती. तसेच पेट्रोलपंपही बंद असल्याचे दिसून आले.
..








