रत्नागिरी / प्रवीण जाधव :
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फसवणुकीची गंभीर समस्या उभी राहत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास होत असला तरी याच साधनांचा वापर करून ठगांनी नवनवीन क्लृप्त्या काढून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. मोबाईल बँकिंग, बक्षिसांचे आमिष, शेअर मार्केटिंगमधून मोठ्या परताव्याचे आमिष तसेच सोशल मिडियातून सर्रासपणे फसवणूक केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील ६ वर्षात तब्बल ६९४ फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कोट्यवधीची फसवणूक करण्यात आली आहे. बहुतेक गुन्ह्यांमध्ये आरोपी अज्ञात असल्याने गुन्ह्यांची उकल करणे, आरोपींना अटक करणे व दोषारोपासाठी सबळ पुरावे गोळा करणे ही सर्व प्रक्रिया पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ९९, २०२० मध्ये ८५, २०२१ मध्ये ८८, २०२२ मध्ये १२७, २०२३ मध्ये १३६, २०२४ मध्ये ११२ तर २०२५ जून अखेरपर्यंत ४७ गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. फसवणूक घटनांमध्ये होत असलेली वाढ ही पोलिसांसमोर चिंतेचा विषय ठरत आहे. वारंवार पोलिसांकडून ‘कोणत्याही आमिषाला बळी पडून नका, फसवणूक टाळा अशा सूचना, आवाहन करण्यात येते. तरीही फसवणुकीच्या घटनांमध्ये घट न होता वाढ होतानाच दिसत आहे. ही फसवणूक टाळता येणे शक्य असतानाही नागरिकांच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे पोलिसांना पुढील प्रक्रिया करताना डोकेदुखी ठरत आहे.
नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक करण्यात येत असल्याच्या सर्वाधिक घटना घडत आहेत. अशा वेळी पुरेशी शहानिशा न करता पैसे दिले जातात. मात्र नोकरी न मिळताच समोरून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार नोंदविण्यात येते. यामध्ये बराच कालावधी गेल्याने पैसे परत मिळण्याची आशाही धुसर होते. त्याचप्रमाणे लॉटरी लागणे, बक्षीस लागणे आदींचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते.
सध्याच्या काळात मोबाईलने विश्व व्यापले आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला असल्याने या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. ‘तुम्हाला कर्ज प्रकरण करून देतो, व्यवसायात मदत करतो, पैसे दुप्पट करून देतो’ अशी प्रलोभने मोबाईल कॉलद्वारे दाखवून जाळ्यात ओढले जात आहे. पैशाच्या लोभापायी सुशिक्षीत नागरिकदेखील या भुलथापांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणतेही पैशांचे व्यवहार करताना खात्रीपूर्वक करावेत असे आवाहन पोलिसांकडून करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
- कसा घातला जातो गंडा?
मेहनत न करताना आणि कमी पैशात दुप्पट वाढ करून देण्यात आमिष दाखवून तसेच कर्ज तात्काळ उपलब्ध करून देतो अशा संदेशांवर विश्वास ठेवून अनेकजण आपला खाते क्रमांक, ओटीपी, एटीएम कार्ड यांची माहिती देतात. त्यानंतर काही मिनिटांतच खात्यातील रक्कम गायब होते. विशेष म्हणजे कोणतीही बँक नागरिकांकडे ओटीपी, खाते क्रमांक मागत नाही. हे प्रत्यक्ष बँकाही ग्राहकांना सांगत आहेत. तरीही समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बँक खात्याबाबत माहिती दिली जाते. फसवणूक करणारे आरोपी अज्ञात असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असते.
- आर्थिक नुकसानीसोबत मानसिक तणावाचाही करावा लागतोय सामना
फसवणुकीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर मानसिक तणावालाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यभर जमावलेली पुंजी एका क्षणात गमावली जात असल्याने दडपण येत आहे. समाजातील विश्वासाची पातळी घटत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळा जादा परताव्यापोटी कर्ज काढून पैशाची गुंतवणूक केली जाते. फसवणूक झाल्यास नागरिक मानसिक ताण तणावाखाली येतात. शेवटी पर्याय नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलण्यात येते. यामुळे कुटुंबाची देखील मोठी वाताहात होते.
- तातडीने तक्रार दाखल करण्याचे पोलिसांचे आवाहन
सायबर पोलीस विभागाकडून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत जनजागृती केली जात आहे. संशयास्पद कॉल, ई-मेल किंवा मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला न देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. फसवणूक टाळण्याासठी पोलिसांशी तात्काळ संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार तातडीने थांबवून तक्रारदाराने कमीत कमी नुकसान होईल यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मात्र अनेक वेळा महिने, वर्ष उलट्यानंतर तक्रार दाखल केली जाते.
- शासनाकडून शाळा, महाविद्यालयात जनजागृतीचे कार्यक्रम
राज्य व केंद्रशासन सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना राबवत असून तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. शाळा – महाविद्यालयांमध्येही सायबर साक्षरता वाढवण्यावर भर दिला जात आहे. आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान हे मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी मदत करते. मात्र याच गोष्टीचा फायदा फसवणूक करणारे उचलत असतात.
फसवणूक ही केवळ आर्थिक गुन्हा नसून सामाजिक समस्या आहे. त्यामुळे समाजातील विश्वासाचे बंध कमकुवत होतात. यासाठी शासन, पोलीस यंत्रणा, नागरिक यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘सावध रहा, सुरक्षित रहा’ हा मंत्र प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे.
- फसवणुकीची प्रमुख कारणे
१) लालसा व लोभ झटपट श्रीमंत – होण्याची लालसा अनेकांना भुरळ घालत असते.
२) असावधपणा- अनेकजण आपली गोपनीय माहिती उघड करतात. सतर्कता न बाळगता सहजपणे माहिती दिली जाते.
३) बेरोजगारी व आर्थिक अडचणी- पैशाची गरज लोकांना चुकीच्या मार्गावर ढकलते.
४) समाजमाध्यमांचा गैरवापर- समाजमाध्यमांचा वापर करून लोकांना भुरळ घातली जाते.
- फसवणुकीचे प्रकार
१) आर्थिक फसवणूक – ऑनलाईन बँकिंग, एटीएम, क्रेडिट कार्ड व गुंतवणुकीच्या बनावट योजना याद्वारे होणारी फसवणूक
२) तांत्रिक फसवणूक – फेक वेबसाईट, मोबाईल कॉल, ई-मेल व सोशल माध्यमांचा वापर करुन
३) सामाजिक फसवणूक – बनावट प्रमाणपत्रे, खोट्या ओळखी, व जवळीक साधून दिशाभूल करून केलेली फसवणूक








