उर्वरित रत्नागिरी मात्र साफसफाई अन् डागडुजीपासून वंचित
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन सध्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱयात व्यस्त आहेत. यानिमित्ताने ज्या भागात मुख्यमंत्री फिरणार फक्त तेवढय़ाच भागाची साफसफाई अन् डागडुजी केली जातेय. मात्र शहरातील बहुतांशी स्थळे मात्र या साफसफाईपासून वंचितच आहेत. कदाचित या भागात मुख्यमंत्री येणार असते तर या भागांचीही स्वच्छता झाली असती, असे मत सामान्य नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
याचदरम्यान जेलनाका परिसरात मुख्य रस्त्यावर फुटलेल्या नगरपालिकेच्या पाईपलाईनची दुरुस्तीही तत्काळ करण्यात आली व तत्काळ त्या भागात डांबरीकरणही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हिच पाईपलाईन जर अन्य वेळेस फुटली असती तर काही दिवस, काही महिने पाणी वाहून गेल्यावर मगच नगरपालिका प्रशासनाला जाग आली असती, असे नागरिकांकडून बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱयानिमित्ताने रत्नागिरी शहरात साफसफाई व डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. काही दिवसांपासून रस्ते, दुभाजक नगरपालिकेच्या अग्निशमनसाठी वापरण्यात येणाऱया बंबाने धुण्याचे काम सुरु आहे. दुभाजकांबर लावलेली झाडेही आता व्यवस्थित कटिंग करण्याचे काम सुरु आहे. कित्येक महिने खड्डय़ांचे साम्राज्य असलेल्या आठवडाबाजार ते काँग्रेसभवन या परिसरातील रस्ताही यानिमित्ताने व्यवस्थित करण्यात आला आहे. फक्त मुख्यमंत्री दौरा नाहीतर अन्य कुणा मान्यवरांचा दौरा असेल तेव्हाच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होते व आपली सर्व यंत्रणा कामाला लावून कामे तडीस नेण्यात येतात. मग हीच यंत्रणा दररोज काम करताना कुठे जाते, असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे