मोठ्या साठ्यांसह गावागावातील दुकाने, टपऱ्यांमधून होतेय खुलेआम विकी, कारवाईनंतर पोलिसांकडून टेबल जामीन मिळत असल्याने व्यावसायिक बिनधास्त, आशीर्वाद कोणाचा?, जोरदार रंगलेय चर्चा
चिपळूण प्रतिनिधी
गेल्या काही वर्षापासून तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूचा महापूर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरालगत मोठेमोठी गोडावून असल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत असून गावागावातील दुकाने, टपऱयांवर खुलेआम या दारूची विकी होताना दिसत आहे. एखादी कारवाई झाल्यास पोलिसांकडून टेबल जामीन दिला जात असल्याने व्यावसायिक बिनधास्त झाले आहेत. त्यामुळे या व्यवसायाला नेमका आशीर्वाद कोणाचा, अशी चर्चा येथे रंगली आहे.
गावठीपेक्षा गोवा बनावटीची दारू बरी म्हणत तळीराम या दारूचे सर्वाधिक सेवन करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बंदी असलेली ही दारू चोरट्या मार्गांनी येथे आणून विकली जात आहे. कमी पैशात मिळणारी दारू येथे चढ्या दराने विकून त्यातून बक्कळ पैसे मिळवले जात आहेत. असे असताना येथे तितक्याशा पमाणात कारवाई होताना दिसत नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी या दारूची वाहतूक करणारा चक्क कंटेनर पकडून बाबासाहेब बुदवंत याला पकडून त्याच्याकडून 24 लाखाची दारू जप्त करण्यात आली. त्या पाठोपाठ पोलिसांनी कळंबस्ते-बौध्दवाडी येथे एका घरावर छापा टाकून 4 लाख 73 हजार 282 रूपयांची दारू जप्त करीत राजाराम जोईल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही कारवाया धडक असल्या तरी आरोपींनी मात्र त्याचा तितकासा धसका घेतला नसल्याचे दिसत आहे. कंटेनर मालक बुदवंत याच्याकडून बरीच माहिती पुढे येईल, असे वाटत होते. मात्र पोलिसांनी पत्रकारांना आतापर्यंत दिलेल्या माहितीवरून तसे दिसून येत नाही. तर टेबल जामीन होतो, असे म्हणत जोईलही बिनधास्त असल्याचे दिसत आहे. या दोन कारवायांचा विचार करता इतकी दारू जप्त झाली आहे. मात्र आजही शहरासह लगतच्या गावांमधील दुकाने, टपऱयांमधून गोवा बनावटीची दारू विकली जात आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त पोलीस कसा करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
टेबल जामीन महाग म्हणजे काय?
कारवाईनंतर पोलीस टेबल जामीन देतात. मात्र हा जामीन थोडा महाग पडतो, असे अनेकजण सांगतात. त्यामुळे असा जामीन मिळवण्यासाठी नेमकी काय पकिया करावी लागते, अशी चर्चाही येथे सुरू आहे.
कारवाईचे कळंबस्ते गाव योगायोग की…
पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर कळंबस्ते गावी पकडला. तसेच येथेच घरावर छापा मारून मोठा साठा जप्त केला. त्यामुळे दोन्ही कारवाईतील कळंबस्ते गाव हा योगायोग की कंटेनर कारवाईचा दुसऱया कारवाईशी संबंध आहे, असा पश्नही उभा ठाकला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत कोठे?
दारूवर कारवाई करण्यासाठी शासनाचा उत्पादन शुल्क हा वेगळा विभाग आहे. मात्र गेल्या काही महिन्यातील कारवाया या पोलीस विभाग करीत आहे. त्यामुळे पोलिसांनी यात विशेष लक्ष का घातले आहे, असा सवाल उपस्थित होत असतानाच ज्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, त्या उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नेमके आहेत कोठे, असा पश्न उपस्थित होत आहे.