टाळसुरे, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : दापोलीमधून शनिवारी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.मात्र ही आत्महत्या,अपघात की घातपात याचा तपास लावण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे.
दापोलीमधील स्टेट बँक ऑफ इंडियात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत ओमळी-चिपळूणची २४ वर्षीय निलिमा चव्हाण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत घरी न पोहोचल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची शोधाशोध करण्यास सुरुवात केली व ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचे वडील सुधाकर चव्हाण यांनी दापोली पोलिसात दिली होती. या फिर्यादीनुसार तपास केला असता ती शनिवारी सकाळी दापोली बसस्थानकात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समजले.
दापोलीतून खेड येथे ती बसने गेली.खेड येथेही ती बस स्थानकावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळली.मात्र तिथून ती पुढे कोठे गेली,याचा तपास लागलेला नव्हता.मंगळवारी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळला.मृतदेह पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते.मात्र निलिमाच्या हातात असलेल्या अंगठीवरून तिची ओळख पटवणे शक्य झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.निलिमाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला,हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.









