रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri News : तालुक्यातील हातखंबा-तारवेवाडी येथे पैशासाठी ब्लॅकमेल केल्याच्या रागातून मैत्रिणीचा खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संतोष बबन सावंत (वय-40,रा. हातखंबा तारवेवाडी,मूळ रा. चिपळूण) असे आरोपीचे नाव आहे. अनैतिक संबंधातून मैत्रिणीकडून ब्लॅकमेल केले जात होते. या रागातून संतोषने तिचा सुऱ्याने भोसकून निर्घृणपणे खून केला,असा आरोप संतोष याच्यावर ठेवण्यात आला होता.रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ॲड प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. ज्योती उर्फ शमिका शिवराम पिलणकर (रा. 32, फणसोप टाकळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
खटल्यातील माहितीनुसार, आरोपी संतोष सावंत ट्रकचालक म्हणून काम करत असून, तो पत्नीसह हातखंबा तारवेवाडी येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला होता. दरम्यान, अपघातात संतोष याच्या पायांना दुखापत झाल्याने तो घरीच राहत होता. संतोष याच्या मित्राने त्याची शमिकाशी ओळख करून दिली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. संतोष याची पत्नी हॉटेल येथे कामाला गेल्यानंतर शमिका ही संतोष याच्या घरी येत-जात असे. अनैतिक संबंधातून शमिका ही संतोषला ब्लॅकमेल करून वारंवार 5 हजार, 2 हजार असे रूपये उकळत होती.10 जानेवारी 2019 रोजी संतोषची पत्नी सोनाली कामावर गेली असताना शमिका कपड्यांची बॅग घेऊन संतोषच्या घरी आली.यावेळी शमिका व संतोष यांच्यात पैशावरून जोरदार बाचाबाची झाली.याच रागातून संतोषने सुरा घेऊन तिच्या पोटात दोनवेळा भोसकला.यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तसेच तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतोष हा रिक्षाने पत्नी कामावर असलेल्या हॉटेलवर गेला. तसेच घडलेली हकिगत पत्नीला सांगितली. या प्रकरणी संतोष याच्या पत्नीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तकार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच गुह्याचा तपास तत्कालीन रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्या दरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 22 साक्षीदार तपासले. न्यायालयापुढे आरोपी संतोष याच्याविरूद्ध आरोप सिद्ध झाल्याने त्याला भादंवि कलम 302 नुसार जन्मठेप व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात पैरवी म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील आयरे यांनी काम पाहिले.









