जलवाहिनी फुटीमुळे नगर परिषदेला झालेय ‘नाकीनऊ
रत्नागिरी : प्रतिनिधी
कोट्यवधी रुपये खर्चून रत्नागिरी शहरासाठी टाकण्यात आलेली नवी पाणी योजनेची जलवाहिनीची दुरूस्ती करताना नगर परिषद प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. एकदा नव्हे तर वारंवार जलवाहिनी पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटत असल्याने त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचारीवर्ग नेमण्याची नामुष्की येण्याची वेळ आली आहे.
शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यापासून वारंवार अनेक ठिकाणी ती फुटण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यापूर्वी या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. काम पूर्णत्वास जात जाताच शहराला पाणीपुरवठा सुरू झाला. पण त्यानंतर जलवाहिनी ठिकठिकाणी पाण्याच्या दाबामुळे धडाधड फुटण्याचे प्रकार घडले आहेत व आजही घडत आहेत. योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम आणि ते उरकण्याची झालेली घाई याचा परिणाम या कामाच्या दर्जावर आता शहरातील सुज्ञ नागरिक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
जलवाहिनी ठिकठिकाणी पाण्याच्या दाबामुळे रस्त्याचे डांबरीकरण फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर पाण्याचे मोठे पाट वाहू लागतात. लागोलाग नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची यंत्रणेची धावाधाव होऊन त्या जलवाहिनीला प्रत्येकवेळी जोड देण्यात येऊन दुरूस्ती केली जात आहे. पण त्या दुरूस्तीनंतर योजनेचे शुक्लकाष्ट संपलेले नाही. सुरुवातीला पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाईप फुटत असल्याचे कारण सांगण्यात आले होते. पण या योजनेचे पाईप वारंवार फुटत आहेत. या पाईपलाईनच्या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले जात आहेत. नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा आता या सातत्याने जलवाहिनी फुटीच्या प्रकारामुळे हैराण झाली आहे. दुरूस्तीनंतरही पाईप फुटी थांबत नसल्याची स्थिती आहे. 8 दिवसांपूर्वी शहरातील नगर परिषदेसमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पाणी योजनेचे पाईप फुटले होते. फुटलेला पाईप तुकडा टाकून जोडण्यात आला होता. त्याचे काम करून झाले नाही तोच आता परत शनिवारी आंबेडकर पुतळ्याच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे पाट वाहिले. अगदी जयस्तंभापर्यंतच्या रस्त्यावरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. त्यामुळे त्या दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेची मोठी धावपळ उडाली होती.









