Ratnagiri News : रत्नागिरी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. गेल्या आठवडाभरात दोन मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला.हे प्रकार वाढत चालले असल्याने नागरिक स्व:ताला असुरक्षित समजत आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.
कोकण नगर येथे असणाऱ्या उर्दू शाळेतील मुलावर एका कुत्र्याने हल्ला केला आहे.या हल्ल्यात हा मुलगा जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांनी मोठा उच्छाद मांडला आहे.
काल २ च्या सुमारास बैलबाग येथे शिवांश रसाळ हे अडीच वर्षाचे बाळ खेळत खेळत उंबऱ्याबाहेर आले.एवढ्यात एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलाच्या आजीने जेवणाचे ताट फेकून मारत त्या कुत्र्याच्या तावडीतून बाळाला सोडवले.कुत्र्याने दोन ठिकाणी चावा घेतल्याने बाळ जखमी झाले.त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.शहरात अनेक ठिकाणी भटकी कुत्री वाहनांच्या मागे लागतात.रस्त्यातून जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतात.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नगर परिषदेने यांची योग्य दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.