रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील मुरूगवाडा येथील तीन पत्ती जुगार कारवाइचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात इसमांनी आयोजक घर मालकावर दबाव टाकून सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यास भाग पाडल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. दरम्यान जुगाराच्या वेळी असलेल्या 40 ते 45 लाखांचे काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही.
नुकतीच शहरातील मुरूगवाडा येथे तीनपत्ती जुगारावरील कारवाईत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला व 44 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान या तीनपत्ती जुगारात सहभाग घेण्यासाठी 2 लाख रूपये प्रवेश फी ठेवण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांना केवळ 44 हजार रूपयांचा मुद्देमाल सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
गणेशोत्सवात मुरूगवाडा येथे दरवर्षी तीनपत्ती जुगार खेळवला जातो. त्यासाठी नियमित ‘पाकिट’ जात असल्याने यावर कारवाई होणार नाही अशी आयोजकांना खात्री होती. मात्र पोलिसांनी कारवाई केली. परंतु कारवाईनंतर रंगलेल्या कागदांनुसार प्रत्यक्षात जुगार खेळण्यात येत असलेले ठिकाण व गुन्ह्यांमध्ये दाखवण्यात आलेले ठिकाण वेगळे असल्याची चर्चा रंगली आह़े ही चर्चा सुरु असतानाच काही व्यक्तींनी आयोजकाला तेथील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती समोर येत आहे. या जुगारात अनेक बडी धेंडे उपस्थित होती व त्यांच्याकडे लाखो रूपये असल्याचे सांगितले जात आहे. ही मोठी रक्कम नेमकी कुणी गडप केली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचे माहित असलेले उत्तर पोलीस तपासात उघड होणार की ‘तपास सुरूच राहणार’ याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









