ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्र सरकारने जीएसटीच्या परताव्याची रक्कम राज्यांना वितरित केल्यानंतर महाराष्ट्रात केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा एकदा रंगला आहे. राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर केंद्र सरकारने आम्ही जीएसटीच्या (GST) परताव्याचे सर्व पैसे चुकते केले, असे म्हटले आहे. यावरुन सध्या सुरु असलेल्या वादात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) व महाविकास आघाडी शासनावर जोरदार टीका केली आहे. अर्थमंत्री हे पद बुद्धिमान माणसाकडे असावं, असा उपरोधिक टोला त्यांनी ट्विट करुन लगावला.
केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या जीएसटी परताव्याच्या आकडेवारीवरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावरुन प्रतिक्रिया देताना ५० टक्के पैसे अद्याप केंद्राकडे शिल्लक असल्याचं म्हटलंय. मात्र आता याच प्रतिक्रियेवरुन भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावत त्यांचा फायनान्स हा विषय कच्चा असल्याचा शाब्दिक चिमटा काढलाय.
या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, अजित पवार म्हणतात GST चे ५० टक्के पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र ५ लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या ३० ते ४० हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा फायनान्स (finance) विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं, असे निलेश राणे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तसेच अन्य एका ट्विटमध्ये, “सगळी चर्चा जीएसटीवर पण ठाकरे सरकारने दोन वर्षात दोन लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादलं आहे. या विषयावर कोण बोलत नाही. दोन वर्षात महाराष्ट्राला दोन लाख कोटींनी गरीब करणारं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसं हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाही,” असं निलेश राणेंनी म्हटलंय.