प्रतिनिधी रत्नागिरी
मौजे बारसू,ता.राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावित गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम 25 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे.
26 एप्रिल 2023 सकाळी ठीक 7 वाजता सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. आज खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सर्वेक्षण ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच सर्वेक्षणाच्या ठिकाणापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर जमलेल्या ग्रामस्थांचीही समक्ष भेट घेवून चर्चा केली.
दुपारी 3 वाजता जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. दिवसभर सर्वेक्षणाचे काम शांततेत सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.जिल्हा प्रशासनाची ग्रामस्थांसोबत सतत चर्चा सुरु आहे. 27 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होवून प्रकल्पाबाबत वस्तुनिष्ठ माहिती घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








